एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोहली शेर तर केदार सव्वाशेर...
नववर्षात टीम इंडियाच्या मिशनची सुरुवात विजयाने झाली. 350चं टार्गेट, बॅटिंग विकेट, धावांचा पाठलाग, भारताची मजबूत बॅटिंग ऑर्डर. वीक एन्ड सेलिब्रेशनसाठी परफेक्ट सिच्युएशन. मात्र 63ला 4 असताना धाकधूक वाटली. आपला पतंग गूल होतोय का असं वाटलं? पूर्वी सचिन आऊट झाला की, मंडळी चॅनल चेंज करायची किंवा टीव्ही बंद करून सरळ राऊंड मारायला निघायची, नंतरच्या काळात चित्र बदलत गेलं, आपल्याकडे सचिनसोबत सेहवाग, गांगुलीसारखे मॅचविनर्स आले, सचिन कोसळल्यावरही आपण विजयाचं शिखर गाठायचो. आता सचिनची ती जबाबदारी कोहलीने घेतली आहे. हा माणूस इतक्या थंड डोक्याने मॅच घेऊन जातो की, क्षणभर प्रतिस्पर्धीही प्रेमात पडावेत.
काल सेहवाग कॉमेंट्रीला असताना कोहलीने एक सिक्सर मारली, सेहवाग म्हणाला, स्वीट शॉट. प्यारा शॉट था.... विचार करा.... एक मशीनगन दुसऱ्या मशीनगनमधून चाललेल्या गोळीचं कौतुक करतो. कोहलीचा तो फटकाही तसाच होता. हर्ष भोगलेंचं विराटच्या या खेळीबद्दलचं ट्विटही तितकंच बोलकं होतं. ट्विटमध्ये ते म्हणाले, Just another day at work for @imVkohli. Brushed his teeth, had a shower, breakfast, century in a chase. Just another day really!
खरंय, कोहली इतक्या सहजतेनेच सेंच्युरी ठोकतोय आणि सामने जिंकून देतोय. रॉजर फेडरर एका जमान्यात असाच फॉर्मात होता, की वाटायचं ग्रँड स्लॅम फायनलच्या दिवशी तो बायकोला सांगून येत असावा, जरा आलोच हा, एक ट्रॉफी जिंकून.
कोहलीचा सध्याचा फॉर्म हा तसाच आहे, आणि तो तसाच राहावा. त्याला दृष्ट नको लागायला. या सामन्यात जास्त कौतुक वाटलं ते केदार जाधवचं. कोहलीला या निखाऱ्यांवर चालण्याची आता सवय आहे. केदारसाठी ही आग नवीन होती, तरीही पाय न भाजता तो त्यावर रॅम्पवॉक करावा तसा चालला. सातच्या रनरेटने खेळायची गरज असताना एका वेळी स्थिती चार बाद 63. आणखी एक विकेट गेल्यावर आपल्याकडे होते, पंड्या, अश्विन आणि जडेजा. या तिघांपैकी पंड्या आता कुठे बाळसं धरतोय. (कोहली, केदार आऊट झाल्यावर पंड्याने मॅच्युअर इनिंग केलीच) अश्विन आणि जडेजा हे बॉलर्स म्हणून स्थिरावलेत, टेस्टमध्ये त्यांना आपण ऑलराऊंडर म्हणून पाहतोय, इथे मैदान, प्रेशर, समोरचा स्कोर सारं काही वेगळं होतं. त्यामुळे प्रामुख्याने मदार जाधव-कोहली जोड़ीवर. केदारने आल्यापासून एक गोष्ट सातत्याने केली ती, सातचा रनरेट मेन्टेन ठेवला. अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स. हेच सूत्र वापरून त्याने बॅटिंग केली. त्याच्या काऊंटर अटॅकने कोहलीचं काम सोप्प केलं. त्याने एकेरी धावा तर घेतल्याच, शिवाय आपल्याकडे मोठे फटके असल्याचंही दाखवून दिलं. ऑस्ट्रेलियाची टीम म्हणजे हेडनबिडन असतानाच्या काळी या अँप्रोचने खेळायची. मिळाला की फोडला. केदारने ते केलं, त्यामुळे कधीच आपला रिक्वायर्ड रनरेट 8 च्या पुढे गेला नाही.
घरच्या मैदानात खेळण्याचा फायदाही असतो आणि तितकाच दबावही. केदारच्या चेहऱ्यावर मात्र हा दबाव अजिबात दिसला नाही. कोहलीसारखा सुपरहिरो समोर असताना साईड हिरो न होता आपलाही स्टॅम्प त्याने या मॅचवर मारला, हे महत्त्वाचं. यामुळे कोहलीही अधिक फ्रीली खेळू शकला. केदारच्या खेळीचं हेच मोठेपण आहे आणि अन्य खेळाडूंसाठी इशारा. सध्या आपण फलंदाजांच्या बाबतीत बिल गेट्स आहोत, म्हणजे बघा ना....टीमध्ये लोकेश राहुल, धवन, कोहली, धोनी, युवी आणि केदार.... तर संघाबाहेर मनीष पांडे, रहाणे, दुखापतग्रस्त रोहित शर्मा, रायूडू, आपल्या मुंबईचा सूर्यकुमार यादव. अगदी मुरली विजयलाही या लिस्टमध्ये काऊंट करता येईल. लिस्ट मोठी आहे. म्हणून मी बिल गेट्स म्हटलं. केदारच्या या इनिंगने आपलं उत्तम टेम्परामेंट तर दाखवलंच. पण, मॅचविनर म्हणून आपली उपयुक्तताही सिद्ध केली.
एक-दोन वेळा कोहलीसोबत क्विक सिंगल्स काढताना त्याची दमछाक झाली कदाचित. पण, असो, कोहलीचा फिटनेस, त्याची धावांची भूक, धावा काढणं नव्हे चोरण्याची त्याची क्षमता, सारं काही विस्मय चकित करणारं आहे. त्याच्यासोबत अशा अनेक पार्टनरशिप झाल्यावर केदारही नक्की अशा चोरट्या धावा काढेल. सध्याच्या जमान्यात वनडे, टी-ट्वेन्टीत मोठ्या स्ट्रोक्सचे फटके तर मारावेच लागतात, सोबत एकेरी-दुहेरी धावांचे ओरखडेही समोरच्या टीमच्या अंगावर ओढावेच लागतात. वर्षाची सुरुवात तर पॉझिटिव्ह झालीय, आता ही मालिका आणि पुढचे सामनेही आपली बॅटिंग क्लिक होत राहो (राहुल, धवन जागो रे....) हीच इच्छा. आफ्टर ऑल वनडे क्रिकेट इज अ बॅट्समन्स गेम.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement