BLOG | त्यांचं आकाशच वेगळं..
आदिशक्तीचा जागर अर्थात नवरात्रोत्सवाची सांगता होत असताना आपल्या हातून एक वेगळा उपक्रम म्हणा किंवा कार्यक्रम पूर्णत्त्वास गेला, याचं जास्त समाधान वाटतंय. हा उपक्रम होता, समाजातील अशा काही स्त्रियांच्या मुलाखतीचा. मुलाखत म्हणण्यापेक्षा फेसबुक गप्पांचा. एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर या स्त्रियांसोबत लाईव्ह गप्पा केल्या. सगळ्यांसाठी वेळ सकाळचीच निवडली होती. गप्पांचा कालावधीही ठरवून घेतला होता 5 ते 7 मिनिटे.
यामध्ये अशा महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला,ज्यांचं तुमच्या आमच्या आयुष्यातलं योगदान फार मोलाचं आहे. तरीही कदाचित काहीसं दुर्लक्षित आहे. अशा एकूण नऊ स्त्रियांशी संवाद साधला.
दिवस पहिला - भाजीविक्रीसाठी येणाऱ्या कविताताई. सफाळ्याहून 10 किलोहून जास्त भाजीची जड पिशवी घेऊन गिरगाव गाठणाऱ्या कविता ताईंचा दिवस मध्यरात्री दीड वाजता सुरु होतो, मग मध्यरात्री 2.10 पर्यंत घरातली कामं आटोपून पुढे भाजी खरेदीसाठी त्या घराबाहेर पडतात, मग थेट भाजी विक्रीसाठी मुंबई गाठतात. दुपारी 2 पर्यंत हे काम संपवून पुन्हा सफाळेकडे कूच. सुमारे 12 तासांचं थकवणारं काम. रात्रीची झोप 10 ते मध्यरात्री 1.30. दुपारी घरी पोहोचल्यावर थोडीशी विश्रांती. हे वेळापत्रक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही थकवणारं आहे. तरी कविताताईंच्या चेहऱ्यावरील हसू कधी लोप पावत नाही.
दिवस दुसरा - घरोघरी जाऊन पोळीभाजी करणाऱ्या दर्शनाताई. त्यांचंही शेड्युल काहीसं असंच. घरचं सगळं आटोपून नवऱ्या-मुलासाठीचा स्वयंपाक करुन बाहेर पडायचं. काही घरांमधील पोळी-भाजी करुन दुपारनंतर घरी परतायचं. मुलाला उच्चशिक्षित करुन त्यांची करिअर नीट मार्गी लागावी, म्हणून अपार कष्ट करणाऱ्या दर्शनाताई.
दिवस तिसरा - दोन-तीन इमारतींची साफसफाई करणाऱ्या निशाताई. इमारत म्हणजे जिने, गॅलरी, मजले, प्रत्येक मजल्यावरील सार्वजनिक शौचालय साऱ्याच्या स्वच्छतेची जबाबदारी निशाताई निभावतात. सोबत त्यांचे पतीही असतात. लोकांनी कचरा टाकताना ओला-सुका कचरा वेगवेगळा टाकावा, म्हणजे आमचं तो गोळा करण्याचं काम थोडं सोपं होईल, असं निशाताईंनी आवर्जून सांगितलं.
दिवस चौथा– चप्पल-बूट दुरुस्त करणाऱ्या सीताताई. सोबत त्या छत्री, बॅगाही दुरुस्त करतात. स्वभावाने एकदम खंबीर. कोरोना काळातील दोन वर्षांमधला अनुभव सांगताना मात्र काहीशा भावूक झाल्या. घरचा खर्च भागवताना त्या काळात अंगठी विकावी लागली, हे सांगताना त्यांच्या मनाची झालेली अवस्था त्यांच्या डोळ्यात दिसली. मुलांच्या उत्तम भविष्यासाठी त्याही आग्रही आहेत. चप्पल-बुटांची दुरुस्तीचं काम करताना त्यांनी आयुष्यावर आपला ठसा उमटवलाय हे नक्की.
दिवस पाचवा – घरोघरची भांडी घासण्यासोबत कपडे धुण्याचंही काम करणाऱ्या पार्वतीताई. त्यांना चार मुलं, त्यांचे पती दिव्यांग आहेत, कोरोना काळात काही महिने वगळता त्याही कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी पदर खोचून कामाला लागल्या होत्या.
दिवस सहावा - ज्येष्ठ महिला कांताबेन यांना बोलतं केलं. कांताबेन आपल्या कुटुंबासह हार-फुलंविक्रीचा व्यवसाय करतात. वय वर्षे 76. तरीही हार तयार करताना फुलांची गुंफण इतक्या सफाईने आणि वेगाने करतात की, आपण पाहतच राहतो. संसारही त्यांनी असाच बांधून ठेवलाय. त्यांच्या बोलण्यातून हे जाणवलं. पूर्वी स्वत: फुलं आणायलादेखील जायच्या. पण, आता वयपरत्वे फुलं खरेदी करायला स्वत: जात नाहीत. पण, वेगवेगळ्या प्रकारचे हार तयार करण्यासाठी मोलाचा वाटा उचलतात. मास्क-बिस्क लावून आपली काळजी घेऊन सारं करतात.
दिवस सातवा - थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तो आयाबाईंचं काम करणाऱ्या सुजाताताईंना भेटायला. कोरोनाकाळातही अथक काम कऱणाऱ्या आरोग्यसेविकांपैकी एक म्हणजे सुजाता ताई. वाशीहून येतात. त्यांना शिफ्ट ड्युटी असते. आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करतो, म्हणून कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात लोकांनी आरोग्याच्या भीतीने का असेना , जी वागणूक दिली, ती पाहून मन व्यथित झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मी सध्या जेव्हा ट्रेनमधून येते, तेव्हा लोक नियम पाळत असल्याचं दिसत नाही, असं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही तुमच्यासाठी काम करायला तयार आहोत, मग तुम्ही नियम पाळा, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.
दिवस आठवा - छायाताईंची भेट घेतली. लहान मुलांची शाळेमध्ये ने-आण करणं हे त्यांचं प्रमुख काम. सध्या लहान मुलांच्या शाळा ऑनलाईन असल्याने, काही मुलांना बेबी सीटिंगमध्ये किंवा आईवडील नोकरीउद्योगासाठी गेले असता आजी-आजोबांकडे सोडण्याचं काम त्या करतात. याशिवाय घरोघरी जाऊन पोळी-भाजीसह जेवण तयार करणे, पहाटे दुधाचा व्यवसाय, जवळच असलेल्या चर्चच्या साफसफाईची जबाबदारी. इतकी सारी कामं बॅक टू बॅक करुनही चेहरा हसतमुख. अमिताभच्या कट्टर चाहत्या असलेल्या छायाताईंनी बिग बींचे अनेक सिनेमे अनेकदा पाहिलेत.
दिवस नववा - या उपक्रमाची सांगता केली ती वीणाताईंशी गप्पा करुन. एका आजी-आजोबांच्या घरी सकाळी जाऊन त्यांचं नाश्ता-पाणी करणं, त्यांची देखभाल करण्याचं प्रमुख काम त्या करतात. कोरोना काळाआधी अशाचप्रकारे लहान मुलांना त्या सांभाळत होत्या. म्हणजे त्यांचं नाश्ता-पाणी झालं की, त्यांना शाळा किंवा क्लासला सोडण्याची जबाबदारी वीणाताईंवर होती. गेल्या दोन वर्षात सासूचं निधन, पतीच्या नोकरीबद्दलची अनिश्चितता या साऱ्या परिस्थितीला त्यांनी खंबीरपणे तोंड दिलं. अजूनही देतायत.
या प्रत्येकीशी बोलताना कणखरता, परिस्थितीला निडरपणे सामोरं जाण्याची वृत्ती दिसली आणि तिला मनोमन वंदनही केलं. परिस्थिती कितीही बिकट असली तरी हार मानायची नाही, हे स्पिरीट बहुदा स्त्रियांमध्ये उपजतच असतं. या निमित्ताने ते पुन्हा एकदा अधोरेखित झालं. दिवसभर काम करुन किंवा अगदी पहाटेपासून काम सुरुवात करुनही थकव्याची एक रेषाही चेहऱ्यावर न येणं, कायम हसतमुख राहणं, हे सारं थक्क करणारं आहे. या स्त्री शक्तीला त्रिवार वंदन.