एक्स्प्लोर
राम लक्ष्मण-दुर्लक्षित मराठी सांगीतिक कर्तृत्व
राम लक्ष्मण यांची कारकीर्द हिंदीमध्ये नंतर बहरली असली तरी त्यांनी मराठीमध्ये पण भरीव काम केलं आहे . राम कदम यांच्यासोबत जोडी जमवून त्यांनी दादा कोंडके यांच्या अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांना संगीत दिलं आहे .

नव्वदच्या दशकातल्या संगीताबद्दल चित्रपटसंगीत रसिकांना एक विशिष्ट जिव्हाळा आहे . त्या दशकाने अनेक लोकप्रिय संगीत दिग्दर्शक फिल्मइंडस्ट्रीला दिले . नदीम श्रवण , आनंद मिलिंद , जतिन ललित , अनु मलिक , दिलीप सेन -समीर सेन ही काही त्यातली नाव . पण नव्वदच्या सांगीतिक दशकाचा लेखा जोखा मांडताना एका संगीत दिग्दर्शकाचा लोकांना हमखास विसर पडतो . आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो संगीत दिग्दर्शक मराठी आहे .विजय पाटील हे नाव कानावर पडलं तर अनेकांना समजणार नाही . विजय पाटील उर्फ राम लक्ष्मण म्हणलं की अनेकांची बत्ती जळेल . बॉलिवूडमधला मराठी टक्का किंवा बॉलिवूडवर असणारा मराठी ठसा यातत्सम चर्चा जेंव्हा होतात तेंव्हा त्यात राम लक्ष्मण यांचं नाव हटकून अनुपस्थित का असत याच मला प्रत्येकवेळेस आश्चर्य वाटत . एक भाषिक समूह म्हणून आपण राम लक्ष्मण यांना disown का केलं असावं असाही प्रश्न नेहमी पडतो . त्यांनी मराठी सिनेमात काम करणं बंद केलं म्हणून ?का इतर अनेक संगीत दिग्दर्शकांच्या भोवती अभिजाततेचं एक वलय असत ते राम लक्ष्मण यांच्याकडे नाही म्हणून ? राम लक्ष्मण यांच्या अनेक चाली विदेशी गाण्यांवरून उचलेल्या आहेत म्हणून ? पण असं संगीत चौर्य करणाऱ्या इतर संगीत दिग्दर्शकांच्या नावाने रात रात भर 'एक शाम अमुक तमुक के नाम' अशा नावाने मेहफिली चालतात .मग राम लक्ष्मण यांच्या नशिबी हे भाग्य का नसावं ? का ही सगळीच कारण असावीत ? फार कमी मराठी संगीत दिग्दर्शकांनी हिंदी ब्लॉक बस्टर सिनेमाला जबरदस्त लोकप्रिय संगीत दिलं आहे जितकं राम लक्ष्मण यांनी दिलं आहे .'मैने प्यार किया ' . 'हम साथ साथ है ' , 'हम आपके है कौन ' अशी किती उदाहरण द्यावीत . मग राम लक्ष्मण यांना अनुल्लेखाने का मारले जाते .?ते कुठल्याही न्यूजचॅनलच्या कट्ट्यावर का दिसत नसावेत ? सांस्कृतिक राजधानीमधल्या गप्पांच्या कार्यक्रमात का दिसत नसावेत ? गेलाबाजार कुठल्याही मराठी माध्यमांमध्ये त्यांची गंभीरपणे घेतलेली (म्हणजे तुमचा पिक्चर कुठला किंवा पुढचा पिक्चर कुठला असे प्रश्न नसलेली ) मुलाखत पण कुठे का वाचायला मिळत नसावी ? मग कधीकधी भयसूचक शंका अशी वाटते की ते माध्यमस्नेही नसल्यामुळे आणि प्रसारमाध्यमांशी बोलण्याची कला अंगी नसल्यामुळे मराठी प्रसारमाध्यमांमधून त्यांना शून्यवत स्थान असावं . पण 'क्लासेस'नी कितीही अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला तरी 'मासेस ' मधली त्यांच्या गाण्याची लोकप्रियता त्यांच्यापासून कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही हे निर्विवाद .
राम लक्ष्मण यांची कारकीर्द हिंदीमध्ये नंतर बहरली असली तरी त्यांनी मराठीमध्ये पण भरीव काम केलं आहे . राम कदम यांच्यासोबत जोडी जमवून त्यांनी दादा कोंडके यांच्या अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांना संगीत दिल आहे . दादांचं पान राम लक्ष्मण यांच्याशिवाय हलत नसे .मासेसला आवडणार संगीत कस द्यायचं याचे धडे राम लक्ष्मण यांनी दादांकडूनच घेतले . राम कदम यांचं निधन झाल्यावर पण आपल्या जोडीदाराला आदरांजली म्हणून विजय पाटील यांनी राम लक्ष्मण या नावानेच काम चालू ठेवलं . हिंदीमधली त्यांची कारकीर्द राजश्री प्रॉडक्शनच्या 'एजंट विनोदने ' झाली . नंतर पण हिंदीमध्ये त्यांनी अनेक काम केली . 'हम से बढकर कौन ' सिनेमातलं त्यांचं 'देवा हो देवा गणपती देवा ' गाणं तुफान गाजलं . पण राम लक्ष्मण यांचं नशीब पालटलं ते १९८९ साली आलेल्या 'मैने प्यार किया ' ने . 'मैने प्यार किया ' ने बॉलिवूडमध्ये पुन्हा प्रेमकथांचं युग सुरु झालं . 'मैने प्यार किया ' म्हणटलं की तीन गोष्टी आठवतात .प्रेम आणि सुमनचा पोस्टमन कबुतर , 'एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते ' हा संवाद आणि राम लक्ष्मण यांचं सुपरहिट संगीत . राजश्री प्रोडक्शन्स आणि पर्यायाने सलमानच्या कारकिर्दीत राम लक्ष्मण यांचा मोठा वाटा आहे . 'हम आपके है कौन ' सिनेमा हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातला सगळ्यात मोठ्या हिट्स पैकी एक मानला जातो . तो सिनेमा सुपरहिट होण्यात त्याच्या सुपरहिट संगीताचा पण मोठा वाटा होता . हम आपके है कौन च्या यशामुळे राम लक्ष्मण यांचं नाव इतिहासात कायमच नोंदलं गेलं आहे .राम लक्ष्मण यांनी देव आनंद , मनमोहन देसाई , महेश भट्ट यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम केलं आहे . मेलोडियस संगीत ही राम लक्ष्मण यांची खासियत . लोकांच्या तोंडी सहज रुळतील अशी गाणी देण्यात त्यांचा हातखंडा होता . राम लक्ष्मण यांची कारकीर्द घडण्यात लता मंगेशकर यांचा मोठा वाटा आहे . कदाचित बॉलिवूडमधला मराठी माणूस म्हणून लता मंगेशकरांना त्यांच्याबद्दल आपुलकी वाटत असावी . लता मंगेशकर यांनी चित्रपटांसाठी गाणी गाणं कमी केल्यावर पण त्यांनी राम लक्ष्मण यांच्यासाठी गाण्यास कधीही नकार दिला नाही . 'सातवा आसमान ' , 'हंड्रेड डेज ' , 'अनमोल ' ही या सांगीतिक भागीदारीची चांगली उदाहरण . हिंदीमध्ये एस पी बालसुब्रमण्यम यांचा आवाजाचा वापर राम लक्ष्मण यांनी जितक्या उत्तम प्रकारे केला ,तितका फार कमी लोकांनी केला आहे . त्या काळी असं म्हणटलं जायचं की जर तुम्हाला तुमच्या सिनेमात लताने गाणं गाव असं वाटत असेल तर राम लक्ष्मण यांना साईन करा . पण 'हम साथ साथ है ' मध्ये राम लक्ष्मण यांनी लता मंगेशकरांचा आवाज न वापरता कविता कृष्णमूर्ती , अलका याज्ञीक यांचा आवाज वापरला .पण या सिनेमाची गाणी फारशी चालली नाहीत . सिनेमाला पण अतिशय मर्यादित यश मिळालं . इथूनच राम लक्ष्मण यांच्या कारकिर्दीला उतरत वळण लागलं . एक तर नवीन दमाचे संगीतकार मोठ्या प्रमाणावर यायला लागले आहे . मेलोडियस संगीताची जागा टेक्नो संगीत घेऊ लागलं . चित्रपट संगीतामध्ये क्रांतिकारी बदल होऊ लागले होते .या बदलत्या जगाशी राम लक्ष्मण जुळवून घेऊ शकले नाहीत . हळूहळू त्यांना काम मिळणं बंद होत गेलं . रामलक्ष्मण कालबाह्य होत गेले . ही कालबाह्य होत जाण्याची प्रक्रिया आवाज न करता मांजरीच्या पावलांनी होते . ती कधी झाली हे बहुतेकवेळा ती प्रक्रिया होऊन गेल्यानंतर कळत . राम लक्ष्मण फारसे माध्यमस्नेही पण नसावेत . ओरडून ओरडून मार्केटिंग करणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये ते मिसफिट ठरले याचं फारस आश्चर्य वाटत नाही .
बॉलिवूडमध्ये मराठी संगीतकार ही दुर्मिळ जमात आहे. सी .रामचंद्र , वसंत देसाई, स्नेहल भाटकर अशी काही नाव चटकन आठवतात . अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांना सुपरहिट संगीत देऊन पण राम लक्ष्मण यांचं नाव कुणालाही अगदी मराठी माणसालाही आठवत नाही, हीच या कलाकाराची शोकांतिका आहे . आज राम लक्ष्मण कुठे आहेत , काय करतात याबद्दल कुणालाच माहित नाही. त्यांचा मुलगा म्युझिक अरेंजर आहे असं कुठंतरी वाचनात आलं . या लेखाच्या निमित्ताने चित्रपटरसिकांच्या विस्मृतीमध्ये गेलेल्या या कलाकाराच्या स्मृतींचं पुनरुज्जीवन झालं तर लेखाचा उद्देश सफल होईल .
संबंधित ब्लॉग
सौंदर्यवती : सोनाली बेंद्रे
ब्लॉग : 'घायल' आणि 'घातक' : तत्कालिन भारतीय असंतोषाचे प्रतीक
ब्लॉग : सारे रास्ते वापस हरिहरन के पास आते है
तकिया कलाम : एक विलुप्त होत चाललेली कला
चंकी पांडे : पहलाज निहलानी, बांगलादेश आणि उदयप्रकाश यांनी प्रतिमा घडवलेला नट
सिनेमा 'बघण्याच्या' प्रक्रियेत झालेली इव्होल्यूशन
नव्वदच्या दशकातला पडद्यावरचा दार्शनिक : मोहनीश बहल
गुलशन कुमार : संगीत क्षेत्रातला धूमकेतू जतिन -ललित मध्यमवर्गीयांच्या महत्वाकांक्षा आणि प्रेमाचा भरजरी सांगीतिक तुकडा जेपी-असा दिग्दर्शक ज्याला पाकिस्तानातून धमक्या यायच्या एका हरवलेल्या दशकाची डायरी : एक ऐसी लडकी थी! ब्लॉग : माजघरातल्या उबदार भीतीचा चेहरा एका हरवलेल्या दशकाची डायरी : या ‘सूर्यवंशम’चं काय करायचं ? जावेद जाफरी -दुर्लक्षित गुणवत्तावान अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका गर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट श्रीदेवी नावाचं फेनॉमेन कुमार सानू -एका दशकाचा आवाज (1)
View More
Advertisement
Advertisement




















