Yogini Ekadashi 2024 : आज योगिनी एकादशी; उपवास कधी सोडावा? जाणून घ्या पारण वेळ, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Yogini Ekadashi 2024 : योगिनी एकादशीला यंदा अनेक शुभ योग तयार झाले आहेत. या योगांमध्ये उपवास करुन पुण्याची कामं केल्यास व्यक्तीला निरंतर सुख प्राप्त होतं. योगिनी एकादशीचं महत्त्व नेमकं काय आणि उपवास कधी सोडावा? जाणून घ्या
Yogini Ekadashi 2024 : हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्व आहे. त्यातल्या त्यात ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे. या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाते. त्यानुसार आज योगिनी एकादशी (Yogini Ekadashi 2024) आहे. या एकादशीचा व्रत कठीण असला तरी त्याचा तितका लाभ देखील मिळतो. योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असंही संबोधलं जातं. वैदिक शास्त्रानुसार, योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूच्या निद्राकाळाच्या आधी पाळला जातो. योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशयनी एकादशीपासून 4 महिने निद्रेत असतात. या एकादशीची शुभ मुहूर्त, पारण वेळ, शुभ योग आणि महत्त्व जाणून घेऊया.
योगिनी एकादशी तिथी आणि मुहूर्त
यंदा योगिनी एकादशी 2 जुलै 2024 रोजी आली आहे. विशेष म्हणजे योगिनी एकादशी कृतिका नक्षत्रात होणार आहे. हिंदू पंचांगानुसार, 1 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजून 26 मिनिटांनी एकादशी आरंभ झाली. पण तिथीनुसार, योगिनी एकादशीचा उपवास 2 जुलैला ठेवला जाणार आहे.
योगिनी एकादशी व्रत पारण वेळ
जर तुम्ही २ जुलैला योगिनी एकादशीचा उपवास ठेवत असाल तर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 3 जुलै रोजी उपवास सोडावा. योगिनी एकादशीचं व्रत 3 जुलै रोजी सकाळी 5 वाजून 28 मिनिटांपासून ते 7 वाजून 10 मिनिटांपर्यंत सोडता येईल.
योगिनी एकादशीचं महत्व
पुराणानुसार, योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी उपवास केल्यास मनुष्याला मृत्यूनंतर स्वर्गवास लाभतो, अशी धारणा आहे. अशा व्यक्तीला वैकुंठ लोकात जाण्याचं भाग्य प्राप्त होतं. भगवान श्रीकृष्णांनी देखील युधिष्ठिराला योगिनी एकादशीचं महत्त्व सांगितलं होतं.
योगिनी एकादशी शुभ योग
यंदा योगिनी एकादशीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार झाले आहेत. या दिवशी त्रिपुष्कर योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार झाले आहेच. सर्वार्थ सिद्धी योग 2 जुलैला पहाटे 5 वाजून 27 मिनिटांनी सुरू झाला असून तो दुसऱ्या दिवशी, 3 जुलैला पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी समाप्त होईल. त्रिपुष्कर योग 2 जुलैला सकाळी 8 वाजून 42 मिनिटांपासून सुरू झाला असून 3 जुलैला पहाटे 4 वाजून 40 मिनिटांपर्यंत चालणार आहे. या शुभ योगात पूजा केल्यास दुप्पट फायदा होतो, अशी मान्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: