(Source: Poll of Polls)
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीची अष्टमी आणि नवमी तिथी कधी? कन्या पूजनाचं महत्त्व नेमकं काय? वाचा सविस्तर
Shardiya Navratri 2024 : पंचांगानुसार यावेळी सप्तमी आणि अष्टमी तिथी दोन्ही एकाच दिवशी म्हणजेच 10 ऑक्टोबरला असून शास्त्रानुसार सप्तमी आणि अष्टमी एकाच दिवशी व्रत करणे शुभ मानले जाणार नाही.
Shardiya Navratri 2024 : नवरात्रौत्सवाला (Shardiya Navratri 2024) अगदी उत्साहात सुरुवात झाली आहे. आज नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजेच सप्तमी आहे. नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीचेही विशेष महत्त्व आहे. याचं कारण म्हणजे या दिवशी कन्या पूजन केलं जातं. पंचांगानुसार यावेळी सप्तमी आणि अष्टमी तिथी दोन्ही एकाच दिवशी म्हणजेच 10 ऑक्टोबरला असून शास्त्रानुसार सप्तमी आणि अष्टमी एकाच दिवशी व्रत करणे शुभ मानले जाणार नाही. त्यामुळेच महाअष्टमी आणि महानवमी एकाच दिवशी म्हणजेच 11 ऑक्टोबरला साजरी करायची आहे.
या दिवशी कुमारिका कन्यांना घरी बोलावून त्यांना जेवू घालतात. असे मानले जाते की, या दिवशी मुलींना भोजन दिल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. साधारणत: नवमीच्या दिवशी मुलींची पूजा करून त्यांना जेवण दिले जाते. पण काही भाविक अष्टमीलाही कन्यापूजन करतात. मुलींना भोजन देण्यापूर्वी देवीला नैवेद्य दाखवावा आणि देवीला अर्पण केलेल्या वस्तूही देवीला अर्पण कराव्यात. त्यानंतर मुलींची पूजा करावी.
मुलींची आणि देवीच्या शस्त्रांची पूजा
अष्टमीला देवीची विविध प्रकारे पूजा केली जाते. या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा केली जाते. या तिथीला पूजा करून देवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष नैवेद्य देऊन हवन करावे. याबरोबरच 9 मुलींना घरी बोलावून अन्नदान करावे. दुर्गाष्टमीला दुर्गा देवीला विशेष प्रसाद द्यावा. पूजेनंतर रात्री जागरण करून भजन, कीर्तन, नृत्य करून हा उत्सव साजरा करावा.
कन्या पूजनाचे महत्त्व
ज्योतिषाने सांगितले की, प्राचीन धार्मिक ग्रंथ आणि पुराणानुसार नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारीका पूजन करणं आवश्यक आहे. कारण कन्येची पूजा केल्याशिवाय भक्ताचे नवरात्रीचे व्रत अपूर्ण मानले जाते. कन्यापूजेसाठी सप्तमी, अष्टमी आणि नवमी तिथी योग्य मानली जाते. दहा वर्षापर्यंतच्या मुली कन्याभोजसाठी योग्य आहेत.
'अशी' पूजा करा
कन्यापूजेच्या दिवशी घरी येणाऱ्या मुलींचे खऱ्या मनाने स्वागत केले पाहिजे. यामुळे देवी प्रसन्न होते. यानंतर त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत. यानंतर सर्व नऊ मुलींच्या चरणस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. पाय धुतल्यानंतर मुलींना स्वच्छ आसनावर बसवावे. सर्व मुलींच्या कपाळावर कुंकू लावावा. मुलींना जेवण देण्यापूर्वी देवीला नैवेद्य अर्पण करा, नंतर सर्व मुलींना जेवण द्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :