Navdurga 2024 : पुरुषांनाही मागे टाकणारी नवदुर्गा; स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंटची तळपती तलवार : सौ. रसिका कुळकर्णी यांचा प्रवास
Navdurga 2024 : स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये भारताला जागतिक दर्जा मिळवून देणारी आजची दुर्गा आहे - सौ. रसिका निलेश कुळकर्णी. यांचा जीवन प्रवास नेमका कसा होता? जाणून घेऊया.आजचा रंग : तपकिरी आजची दुर्गा: सौ . रसिका निलेश कुळकर्णी
Navdurga 2024 : यंदाच्या नवरात्रोत्सवातील आजचा रंग आहे तपकिरी..... तपकिरी हा मातीचा रंग आणि मातीशी एका शेतकऱ्या इतकचं जवळचे नाते असते ते खेळाचे आणि तो खेळ समरसून, जीव ओतून खेळणाऱ्या खेळाडूचे.... आजची दुर्गा ही कालरात्रीच्या रूपात आहे... शक्ती अन बुद्धीचा सुरेख मेळ साधत, स्पोर्ट्स इंडस्ट्रीमधे भारताला जागतिक दर्जा मिळवून देणारी आजची आपली दुर्गा आहे... स्पोर्ट्स मॅनेजमेंट क्षेत्रातील एक तज्ञ... सौ रसिका निलेश कुळकर्णी !
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या सह संस्थापिका असलेल्या, रसिका या पूर्वाश्रमीच्या रसिका रणदिवे. अतिशय प्रगत अशा विचारांच्या घरात लहानाची मोठी झालेली रसिका ! आपल्या मुलीने चार चौघींपेक्षा काहीतरी वेगळे करावे अशी त्यांच्या वडिलांची प्रामाणिक इच्छा होती..... आणि बालपणापासूनच आपल्या संवाद कौशल्यामुळे एक चांगला सोशल कनेक्ट असलेल्या रसिका यांनी सायकॉलॉजीची डिग्री घेतल्यानंतर त्यात पुढे न जाता इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये पुढील शिक्षण घेतले.
सुरुवातीलाच झी सारख्या मोठ्या वाहिनीसाठी काम करण्याची संधी त्यांना मिळाली.... मग मिळालेल्या संधीचे सोने करत त्यांनी अनेक इव्हेंट्स आपल्या मॅनेजमेंट कौशल्याच्या जोरावर, प्रचंड यशस्वी केलेत. त्यात सर्वात उल्लेखनीय म्हणजे जेष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या असंख्य कार्यक्रमांची मॅनेजमेंट त्यांनीच केलेली आहे. ह्याच वाटेवर पुढे जाताना.... आशाताईंच्याच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची श्री. निलेश कुळकर्णी यांच्याशी भेट झाली आणि रसिका रणदिवे… सौ रसिका निलेश कुळकर्णी झाल्या.
2010 साली पती, निलेश यांच्या साथीने त्यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटची स्थापना केली..... त्यावेळी २ ते ३ स्टाफ आणि १० बाय १० च्या एका छोट्याशा खोलीत सुरू केलेल्या या संस्थेचा गेल्या १४ वर्षात एक डेरेदार वृक्ष झालाय..! आज याच संस्थेत जवळजवळ 100 लोकांचा स्टाफ आणि अंधेरी मध्ये त्यांचा स्वतःचा भव्य असा कॅम्पस आहे ! परंतु हे मुळीच सोपे नव्हते रसिका यांना हे सगळं उभं करताना स्वतःही प्रचंड अभ्यास करावा लागला ! कारण.... स्पोर्ट्स इंडस्ट्रीमधले सगळे बारकावे अभ्यासणे... सगळ्या बाबींचा नीट विचार करून त्याचा अभ्यासक्रम म्हणजेच सिलॅबस तयार करणे आणि त्यातील तज्ञांची काटेकोरपणे निवड करून त्यांच्यावर योग्य ती जबाबदारी सोपवणे, ती त्यांच्याकडून नीट पार पाडून घेणे… हे अतिशय मोठे दिव्य होते... पण सौ. रसिका निलेश कुळकर्णी नावाच्या या आधुनिक दुर्गेने आपल्या संवाद कौशल्याच्या बळावर आणि आपल्या टीमच्या सहकार्याने... हे शिव धनुष्य अगदी यशस्वीपणे पेलले आहे...!
पुरुष मक्तेदारीच्या ह्या क्षेत्रात स्वतःचा पाय घट्ट रोवताना त्यांनी.... अनेक मुलींना तरुणींनाही या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहित केले..... त्याचमुळे सुरुवातीला नगण्य असलेले मुलींचे प्रमाण आता लक्षणीयपणे वाढले आहे. ज्या देशासाठी आपण खेळतो, त्या देशाबद्दलचे प्रेम व्यक्त व्हावे... यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट मधील आपल्या अनुभवाच्या बळावर रसिका यांनी सर्व खेळाडूंना, यात अनेक ऑलिम्पियंस ही होते, त्यांना सोबत घेऊन राष्ट्रगीताचे सादरीकरण करण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न केला, जो प्रचंड यशस्वी ठरला ! एका वेगळ्याच क्षेत्रात अगदी अशक्य वाटणारे करियर जिद्दीच्या, अथक परिश्रमाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर यशस्वीपणे करणाऱ्या या दुर्गेची ही कहाणी कुणालाही प्रेरणादायी अशीच आहे..!
हेही वाचा: