Narali Purnima 2024 : सण आयलाय गो...नारळी पुनवेचा; कोळीबांधवांच्या या सणाचं महत्त्व नेमकं काय? जाणून घ्या पौराणिक कथा
Narali Purnima 2024 : श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे कोळीबांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात.
Narali Purnima 2024 : सणवाराच्या श्रावण (Shravan 2024) महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव नारळी पौर्णिमा (Narali Purnima) म्हणून साजरा करतात. या दिवशी कोळीबांधव दर्याराजाला श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते.
नारळी पौर्णिमेची प्रथा :
श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे कोळीबांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्रात मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांचा हा महत्त्वाचा सण आहे. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करून त्याला साककडे घालतात. तसेच वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेनुसार समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करतात.
नारळी पौर्णिमेचा दिवस हा कोळी बांधवांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो. या दिवशी कोळी बांधव बोटींची पूजा करतात. बोटींना पताके लावतात. तसेच या दिवशी ठिकठिकाणी कोळीवाड्यातून मिरवणुका काढल्या जातात. कोळी महिला या दिवशी पारंपरिक साड्या नेसून भरजरीत दागिने घालतात. तर पुरुष प्रथेप्रमाणे पारंपरिक पोशाख घालतात. या दिवशी वाजत गाजत मिरवणुका काढल्या जातात.
नारळी पौर्णिमेला खेळतात 'हे' पारंपरिक खेळ :
नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक कोळीवाड्यात पारंपरिक खेळ खेळण्याची देखील प्रथा आहे. या सर्वात प्रसिद्ध खेळ म्हणजे नारळ फोडणे. हातात नारळ घेऊन तो एकमेकांवर आपटून फोडण्याची कोळीवाड्यात फार जुनी प्रथा आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: