Kolhapur Jotiba Yatra : चांगभलं! जोतिबा डोंगर गुलालानं न्हाऊन निघाला; यात्रेचा आज मुख्य दिवस, आतापर्यंत 8 लाख भाविक दाखल
Kolhapur Jotiba Yatra 2024 : गुलाल खोबऱ्याची उधळण, चांगभलंचा गजर आणि मानाची सासनकाठी नाचवत जोतिबा यात्राची मुख्य रंगत सुरू झाली. लाखो भाविकांच्या गर्दीत अवघा जोतिबा डोंगर फुलून गेला.
Kolhapur : दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या कोल्हापूरच्या (Kolhapur) जोतिबाच्या दर्शनाला लाखो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झालेत. चांगभलंच्या गजरात आणि गुलालाची मुक्त उधळण करत मानाच्या सासनकाठ्या दाखल होत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस असून ज्योतिबा मंदिरात पहाटे तीनपासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ झाला.
कर्नाटकातील भाविकांचीही जोतिबा गडावर मांदियाळी
केवळ महाराष्ट्रातून नाही, तर दक्षिण भारतातून सुमारे सात ते आठ लाख भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. मानाच्या सासनकाठीचं पूजन झाल्यानंतर संध्याकाळी पालखी सोहळा पार पडणार आहे. यंदा पाऊसमान चांगला व्हावा, रोगराई येऊ नये, असं साकडं भाविकांनी जोतिबाला घातलं. महाराष्ट्र, कर्नाटकासह बाजूच्या राज्यांतून भाविक कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
रात्री दहा वाजता होणार यात्रेची सांगता
आज ज्योतिबाच्या नावानं चांगभलं जा गजरात जोतिबाची यात्रा पार पडत आहे. यासाठी आतापर्यंत तब्बल आठ लाख भाविक जोतिबा डोंगरावर उपस्थित झाले आहेत. यात्रा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे. जोतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता होईल.
जोतिबा यात्रेत सासनकाठ्यांना विशेष मान
जोतिबा चैत्र यात्रेला वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या सासनकाठ्या हे यात्रेचं एक प्रमुख आकर्षण असतं. या मिरवणुकीमध्ये 20 फुटांपासून ते 70 ते 80 फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. सासनकाठी खांद्यावर घेऊन नाचणं, तोरण्या सांभाळणं हे अतिशय कौशल्याचं काम असतं. अनेकजण आपापल्य भागातील सासनकाठ्या घेऊन जोतिबा यात्रेस बहुतांश पायी चालतच येतात. यात्रेत येणाऱ्या असंख्य सासनकाठ्यांपैकी 108 काठ्या मानाच्या असून त्यांना देवस्थान समितीच्या वतीने क्रमानुसार मानपान दिला जातो. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान पाडळी (जि.सातारा), त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), कसबा डिग्रज (ता.मिरज), कसबा सांगाव (ता.कागल) या सासनकाठ्यांना विशेष मान दिला जातो.
जेजुरीच्या खंडेरायाची देखील यात्रा
अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची यात्रा देखील चैत्र पौर्णिमेला यात्रा भरते. आज चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरी, चित्रा नक्षत्र, वसंत जित ऋतु या शुभदिवशी श्री शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण केला. तेव्हापासून दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला जेजुरी नगरीत मोठी यात्रा भरते. विशेषत: या यात्रेस बहुजन बांधव आणि शेतकरी मोठ्या संख्येने येतात. आज आलेल्या भाविकांकडून कुलधर्म कुलाचार करत यळकोट यळकोट जयमल्हार, सदानंदाचा येळकोट असा जयजयकार केला जात आहे.
हेही वाचा: