Khandagras Surya Grahan 2022 : खंडग्रास सूर्यग्रहणात तयार होणार चतुर्ग्रही योग, चार राशीच्या लोकांना होणार फायदा
Khandagras Surya Grahan 2022 : 25 ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण होत आहे. भारतासह आशियाखंडाचा मध्य आणि पश्चिमेकडील प्रदेश, संपूर्ण युरोपखंड, अफ्रिका खंडाचा पूर्वोत्तर प्रदेश या प्रदेशात ग्रहण दिसेल.
Khandagras Surya Grahan 2022 : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण होत आहे. दाते पंचांगानुसार अश्विन वद्य 30 , मंगळवारी म्हणजे 25 ऑक्टोबर 2022 रोजी हे सूर्यग्रहण आहे.
दाते पंचांगानुसार, मुंबई येथील ग्रहणस्थिती
स्पर्श दुपारी 4.49 मध्य सायंकाळी 5.43, सूर्यास्त संध्याकाळी 6.08 मिनिटे.
ग्रहण दिसणारे प्रदेश
भारतासह आशियाखंडाचा मध्य आणि पश्चिमेकडील प्रदेश, संपूर्ण युरोपखंड, अफ्रिका खंडाचा पूर्वोत्तर प्रदेश या प्रदेशात ग्रहण दिसेल.
पुण्यकाल
हे सूर्यग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे. त्यामुळे भारतात कोठेही ग्रहण दिसणार नाही. म्हणून आपल्या गावाच्या स्पर्शकालापासून आपल्या गावाच्या सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ मानावा.
ग्रहणाचा वेध
हे ग्रहण दिवसाच्या चौथ्या प्रहरात लागत असल्याने मंगळवारच्या पहाटे 3:30 पासून सूर्यास्तापर्यंत (25 तारखेला संध्याकाळी 6.08 पर्यंत) ग्रहणाचा वेध पाळावा. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी 12:30 पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इ. करता येतील, तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजे ग्रहण स्पर्श ते सूर्यास्त या काळात (मुंबईसाठी दुपारी 4:49 ते सायंकाळी 6:08) पाणी पिणे, झोपणे, ही कामे करू नयेत.
ग्रहणावेळी काय करावे
ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे.
पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरति शुद्धी असते.
ग्रहणाचे राशिपरत्वे फल
वृषभ, सिंह, धनु, मकर या राशींना शुभफल. मेष, मिथुन, कन्या, कुंभ या राशींना मिश्रफल. कर्क, तुला, वृश्चिक आणि मीन या राशींना अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.
मंत्र
तंत्र पुरश्चरणासंबंधी, नवीन मंत्र घेण्यास व गृहित मंत्राचे पुरश्चरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्यकाल आहे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहण पर्वकालामध्ये केल्याने मंत्रसिद्धी होते.
स्नानाविषयी
ग्रहणात सर्व उदक गंगेसमान आहे तरीही उष्णोदकाहून शीतोदक पुण्यकारक, पाणी वर काढून स्नान
करण्यापेक्षा वाहते पाणी, सरोवर, नदी, महानदी, गंगा, समुद्र यांचे स्नान उत्तरोत्तर श्रेष्ठ व पुण्यकारक आहे. सूर्यग्रहणात नर्मदास्नानाचे विशेष महत्व सांगितले आहे. नर्मदास्नान शक्य नसल्यास स्नानाचे वेळी नर्मदेचे स्मरण करावे.
मोक्षस्नान आणि भोजनाविषयी
या ग्रहणाचा मोक्ष दिसणार नाही तथापि भारतीय प्रमाण वेळेनुसार सर्वात उशीराच्या मोक्ष वेळेनंतर म्हणजे सायंकाळी ६:३२ नंतर मोक्षस्नान करावे आणि दुसरे दिवशी सकाळी शुद्ध सूर्यबिंब पाहून नंतर भोजन करावे.
भरपूर प्रमाणात नामस्मरण करा आणि आनंदात राहा !
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)