Holi 2024 : होळीची अचूक पूजा कशी करावी? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? जाणून घ्या
Holika Dahan Puja Vidhi : वर्षातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे होळी. यंदा पंचांगानुसार होळी रविवारी, म्हणजेच 24 मार्चला साजरी होत आहे. आता घरातील सुख-शांतिसाठी होळीची अचूक पूजा नेमकी कशी करावी? जाणून घ्या
Holi 2024 : भारतीय संस्कृतीत होळी (Holi 2024) सणाला विशेष महत्त्व आहे. होळी येण्याआधीच सर्वांमध्ये होळीचा उत्साह संचारलेला असतो. होळी पेटवण्यासाठी लाकडांची जमवाजमव काही दिवस आधीच सुरू झालेली असते. होळीच्या निमित्ताने पूजा आणि उपासना केली जाते. होळीची मनोभावे पूजा करणाऱ्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होते, अशी मान्यता आहे. यंदा होळी 24 मार्चला साजरी केली जात आहे, तर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 25 मार्चला धुलिवंदन साजरं केलं जाणार आहे. दुसऱ्या दिवशी रंगांचा उत्सव साजरा केला जाईल.
होळीच्या दिवशी मनोभावे आणि अचूक पद्धतीने पूजा केल्याने त्याचे शुभ फळ मिळते. वाईट कृत्यांचा, वाईट प्रवृत्तीचा नाश होतो आणि घरात सुख-शांति नांदते. यासाठी होलिका दहनाची पूजा नेमकी कशी करावी? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि यंदा होलिका दहनाचा शुभ मुहूर्त कोणता? हे थोडक्यात जाणून घेऊया.
होळी दहनाचा आणि पूजनाचा शुभ मुहूर्त
दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते. यंदा पंचांगानुसार, फाल्गुन पौर्णिमा तिथी 24 मार्चला सकाळी 9 वाजून 54 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 25 मार्चला दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी समाप्त होईल.
यंदा होळी दहनाचा शुभ मुहूर्त रविवारी (24 मार्च) रात्री 11 वाजून 13 मिनिटं ते 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत आहे. यंदा होळीवर भद्राकाळाची छाया आहे. मान्यतेनुसार, भद्राकाळात होलिका दहन केलं जात नाही. भद्रा काळात होलिका दहन करणं शुभ मानलं जात नाही. होळीच्या दिवशी भद्रा काळ सकाळी 9 वाजून 54 ते रात्री 11.13 मिनिटापर्यंत असणार आहे.
होलिका पूजनाचे साहित्य
1. एका ताटात हळदी-कुंकू, अक्षता, फुलं, हार, रुईचा कापूस, दिवा, अगरबत्ती, नारळ ठेवा.
2. एका कलशामध्ये पाणी घ्या.
3. नैवेद्य म्हणून तुम्ही पुरणाची पोळी देखील बनवून घेऊ शकता.
होळीची पूजा कशी करावी?
वर दिलेल्या सर्व गोष्टींनी होलिका मातेचं पूजन करा आणि मग पाण्याचे अर्घ्य देत होलिका मातेला पाच किंवा सात प्रदक्षिणा मारा. आता जळत्या अग्नीत नारळ अर्पण करा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा. होळीला प्रदक्षिणा मारल्याने सर्व दुःखांचा नाश होतो आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
होळीला या गोष्टी आवर्जून पाळा
1. सूर्यास्तापूर्वी होलिका दहन करू नये.
2. होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावं.
3. होळीच्या दिवशी केलेल्या चेटूकाचा परिणाम होतो.
4. चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करता येत नाही.
5. होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते, अशी मान्यता आहे.
6. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणा, यामुळे घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Holi 2024 : होळीच्या दिवशी सकाळी करा 'ही' एकच गोष्ट; वर्षभर खिशात राहील पैसाच पैसा