Ganesh Chaturthi 2024 : अवघ्या काही दिवसांवर गणरायाचं आगमन, बाप्पाच्या स्थापनेची 'अशी' करा तयारी, 'या' वस्तू घेतल्या का?
Ganesh Chaturthi 2024 : घराघरांत बाप्पाच्या स्थापनेची तयारी सुरु आहे. तुमच्याही यंदा बाप्पाचं आगमन होणार असेल तर अशा वेळी तयारीसाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लागतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
Ganesh Chaturthi 2024 : श्रावण (Shravan) महिना संपून भाद्रपद महिना सुरु व्हायला अवघे काही दिवसच उरले आहेत. भाद्रपद महिना म्हटला की आपल्या लाडक्या बाप्पाच्या (Lord Ganesha) आगमनाची उत्सुकता सर्व भक्तांमध्ये दिसते. बाप्पाचं आगमन अवघ्या 10 दिवसांवर आहे. 7 सप्टेंबरला घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे. याच निमित्ताने मोठ-मोठ्या मंडळांपासून ते घराघरांत बाप्पाच्या स्थापनेची तयारी सुरु आहे. तुमच्याही यंदा बाप्पाचं आगमन होणार असेल तर अशा वेळी तयारीसाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लागतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
'अशी' करा बाप्पाच्या मूर्तीची निवड
सर्वात आधी बाप्पाच्या मूर्तीची निवड करताना पर्यावरणपूरक अशीच मूर्ती निवडावी. गणपती बाप्पाच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. पण, त्यामधून पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही अशीच मूर्ती निवडा. गणपती बाप्पाची शाडूची मूर्ती किंवा घरी तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती साकारली असेल तर अगदी उत्तम आहे.
गणपतीच्या पूजेची भांडी
गणपतीच्या मूर्तीची निवड केल्यानंतर गणपतीच्या पूजेसाठी कोणकोणती भांडी लागतील याची तयारी करावी. यामध्ये तांब्याचा कलश, फुलपात्र, उदबत्तीघर, तुपाच्या निरांजनी, तेलाचा दिवा किंवा समई, आरतीसाठी घंटा, गणपती बाप्पाला बसायला पाट किंवा चौरंग तुम्ही वापरू शकता. यामध्ये सागाचा किंवा प्लायचा चौरंग तुम्ही वापरू शकता.
गणपती बाप्पाच्या पूजेच्या तयारीचे साहित्य
दरवाजाला तोरण, तांदूळ, हळद, कुंकू, फुले, समई, ताम्हण, निरंजन, जास्वंदाची फुले, दुर्वा, 21 दुर्वांच्या 10 ते 12 जोड्या, 15 विड्याची पाने, गजरे, विविध प्रकारची फुले, 1 खोबऱ्याची वाटी, 1 तेलाचा दिवा, साखर, दही, दूध, साजूक तूप, मध, 5 फळं, कलश, अभीर गुलाल, वस्त्रमाळ, अत्तर, पंचखाद्य, 21 उकडीचे मोदक, लालवस्त्र, पाट, अक्षदा, कलश, नारळ, कुळ आणि सुपारी, 21 पत्री, 10 मोठ्या सुपाऱ्या, 2 जाणवी जोड, कापसाची वस्त्र, अत्तर, धूप, वाती, फुलवाती, कापूर, काडीपेटी, गूळ, पंचामृत, शंख आणि घंटा.
गणपती बाप्पाला घालायला सुंदर कंठी आणि हार. यामध्ये मोत्यांचे हार किंवा फुलांचे हार किंवा कापसाच्या फुलांच्या कंठीसुद्धा तुम्ही अर्पण शकता.
मखर कसा निवडावा?
गणपती बाप्पासाठी सजावट करताना सर्वात महत्त्वाचं असतं ते मखर. कारण मखरामध्येच आपण गणपती बाप्पाची स्थापना करतो. सगळ्यांमध्ये आपला गणपती बाप्पा उठून दिसेल अशाच मखर आणि सजावटीच्या सामानाची निवड करा. यामध्ये तुम्हाला ज्या प्रकारची आरास करायची आहे त्या प्रकारच्या मखराची निवड करावी.
गणपती बाप्पाच्या दागिन्यांची निवड कशी करावी?
गणपती बाप्पाच्या दागिन्यांची निवड करताना तुम्ही आकर्षक दागिने खरेदी करावेत. बाप्पांसाठी कानातले घेताना तुम्ही मोत्यांचे किंवा वेगवेगळ्या खड्यांचे देखणे असे दागिने घेऊ शकता. बाप्पाचा थाट वाढवणारा मुकूटही देखणाच हवा. या मुकूटामध्ये तुम्ही अनेक वेगवेगळे प्रकार पाहू शकता. पण, मुकूटाची निवड करताना आपल्या बाप्पाच्या साईझचाच मुकूट निवडावा. त्याचबरोबर गणपतीचं वाहन उंदीरमामा देखील हवाच.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :