(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mango Farmers : आंबा बागायतदारांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेणार, उदय सामंतांची माहिती
आंबा बागायतदारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात पुढच्या आठ दिवसात मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी दिली.
Mango Farmers : दरवर्षी आंबा बागायतदारांना (Mango Farmers) विविध संकटांचा सामना करावा लागतो. चांगल उत्पादन येऊनही कधी नैसर्गिक आपत्तीचा फटका तर कधी सरकारी धोरणाचा तर कधी कमी दर मिळाल्यानं मोठा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळं आंबा बागायतदारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात पुढच्या आठ दिवसात मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत बैठक घेणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडणार असल्याचे सामंत म्हणाले.
आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मागील दोन वर्षांत अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल, वादळ यामुळं आंबा बागायतदार उध्वस्त होऊन कर्जबाजारी झाला आहे. या संकटातून त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. दरम्यान, बॅंका आणि वित्तीय संथा बगायतदारांची पिळवणूक करत असल्याचा आरोप आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी माजी मंत्री उदय सामंत यांच्याकडे केला होता. याची दखल घेत सामंत यांनी याबाबत मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे.
आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे
मागील अडीच वर्षाच्या काळात आबा बागायतदारांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात सकारात्मक बैठक झाली नसल्याचे उदय सामंत म्हणाले. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचे सामंत म्हणाले. आंबा उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊ असे सामंत म्हणाले.
दरवर्षी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो
आंबा हा कोकणाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर आंब्याची लागवड आहे. मात्र, दरवर्षी शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. दोन वर्ष देशावर, राज्यावर कोरोनाचे संकट होते. यावर्षी कोरोनाचा धोका कमी झाला होता, मात्र अवकाळी पावसानं आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. तसेच वातावरणातील बदालाचाही मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळं उत्पादनात घट झाली होती. अवकाळी पाऊस, उष्णता, थंडी याचे कमी-अधिक होणारे प्रमाण, वातावरणात होणारे बदल या साऱ्या संकटांना गेल्या आठ-दहा वर्षांपासून विशेषतः कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी सामोरे जाताना मेटाकुटीला येत आहे. दरसाल असे संकट कोणत्या ना कोणत्या रूपाने येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: