Watermelon News : कलिंगडाची 'लाली' उतरली, शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी, लाखो रुपयांचा फटका
अचानक कलिंगडाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
Watermelon News : सध्या राज्याचा उन्हाचा चटका बसत आहे. वाढत्या उष्णतेमुळ नागरिक हैराण झाले आहेत. या उन्हाच्या कडाक्यात कलिंगडाला (Watermelon )सोन्याचा भाव आला होता. त्यामुळं कलिंगड उत्पादक शेतकरी आनंदात होता. चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा देखील शेतकऱ्यांनी होती. मात्र, अचानक कलिंगडाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळं लागवडीसाठी केलेला खर्चही निघने अवघड झालं आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील शेतकरी विठ्ठल सोनवणे यांनी तीन एकरात कलिंगडाची लागवड केली होती. लागवडीपासून ते काढणीपर्यंत सव्वालाखाचा खर्च केला होता. परंतु कलिंगड काढणीला सुरुवात झाली की, दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं कलिंगड खरेदीदार मिळत नसल्याने पीक शेतातच नासाडी होत असल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. कलिंगडला चांगला बाजारभाव मिळून दोन पैसे हातात येतील या आशेने पांगरी येथील सोनवणे कुटुंब दिवसरात्र एक करुन कलिंगडाचे संगोपन करत होते. त्यांच्या कष्टाला यशही मिळाले. मात्र बाजारपेठेत भाव मिळाला नाही आणि तीन एकरातील कलिंगडाची अक्षरशः नासाडी झाली आहे. दरम्यान, दिवसरात्र मेहनत घेऊन उत्पादन घेतलेल्या तीन एकर कलिंगड लागवडीतून नऊ लाखांचे उत्पादन अपेक्षित होते.
लागवडीचा खर्चही निघत नाही
रात्रंदिवस काबाड कष्ट करुन त्यांनी जोमात पीक आणले होते. तीन एकरातून त्यांना साधारणतः आठ ते नऊ लाखांचे उत्पादन अपेक्षित होते. मात्र बाजारपेठेत कलिंगडला कवडीमोल भाव मिळत असल्याने त्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. त्यामुळे कलिंगडाचा लाल चिखल होऊन, लागवड केलेला खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. तर बाजारात भाव नसल्याने शेतातच पडून असणाऱ्या लालबुंद कलिंगडाची डोळ्यासमोर नासाडी पाहवत नाही. रात्रंदिवस काबाड कष्ट करून पीक जोमात आणले. हे पीक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असते. त्याचा मोबदला मिळण्यागोदरच शेतात पिकाची नासाडी होताना पाहावत नाही. जोमात आलेलं पीक डोळ्यासमोर नासाडी होत असताना शेतकऱ्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल ही व्यथा त्या शेतकऱ्यालाच ठाऊक असते अशी प्रतिक्रिया कलिंगड उत्पादक शेतकरी विठ्ठल सोनवणे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या: