(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dadaji Bhuse : सेंद्रिय शेतीची आश्वासक वाटचाल, सेंद्रिय शेतीसाठीचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा विचार : कृषीमंत्री दादाजी भुसे
परंपरगत शेतीसोबतच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीसाठीचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार करणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले.
Dadaji Bhuse on Organic Farming News : सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक असून देशात सेंद्रिय उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. परंपरगत शेतीसोबतच कृषी विभागातर्फे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रमाणिकरणासाठी अनेक विभागाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यासाठी सेंद्रिय शेतीसाठीचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात येईल असेही दादाजी भुसे म्हणाले.
सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात पाच विभागांची बैठक घेण्यात आली. यावेळी दादाजी भुसे बोलत होते.
अन्न प्रकिया व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. शेतमालाला चांगला भाव मिळावा. त्याचबरोबर इतर अपारंपारिक भाजीपाल्याची ग्राहकांना ओळख व्हावी, यासाठी आयोजीत केलेल्या रानभाज्या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचेही भुसे यावेळी म्हणाले.
गृहनिर्माण संस्थांमधून सेंद्रिय उत्पादनांची जनजागृती करणार : मंत्री बाळासाहेब पाटील
सेंद्रिय उत्पादनाला योग्य ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी सहकार व पणन विभागातर्फे गृहनिर्माण संस्थांमधून जनजागृती करुन उत्पादनाविषयी माहिती दिली जाईल, अशी ग्वाही सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. याशिवाय पणन विभागाने सुरु केलेल्या ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मवर या उत्पादनांना विक्रीसाठी ठेवता येईल. त्याचबरोबर विक्री मेळावे, प्रदर्शन आणि इतर उपक्रमातुन सेंद्रिय उत्पादनांबाबत प्रबोधन करता येईल असेही पाटील म्हणाले.
पशुंच्या उत्तम वाढीसाठी सेंद्रिय चारा उपयुक्त : मंत्री सुनील केदार
राज्यातील शेतक-यांना दुधाचे उत्तम उत्पादन मिळावे यासाठी पशुंना सेंद्रिय चारा दिल्यास उपयुक्त ठरेल यासाठीचा प्रस्ताव विभागामार्फत तयार करण्याची तयारी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री सुनील केदार यांनी दाखवली आहे. यासाठी मोर्फाच्या सदस्यांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. कोरोनानंतर प्रथिनेयुक्त आहारांचे महत्व लोकांना पटल्यामुळे दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे. तसेच याविषयावर जनजागृती होत असल्याचे केदार यांनी सांगितले.
सेंद्रिय व विषमुक्त शेती या विषयावर अन्न व औषध प्रशासन, सहकार पणन, पशु संवर्धन व दुग्ध विकास, तसेच कृषी विभागाची संयुक्त बैठक सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सेंद्रिय शेती धोरण, सेंद्रिय शेतमालाची विपणन व्यवस्था व इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह कृषीमंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार उपस्थित होते. मोर्फाच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक युगेंद्रदादा पवार, अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हाद वरे उपस्थित होते. तसेच कृषी, पणन, सहकार आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे विविध अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या: