Swabhimani Shetkari Sanghatana : एकरकमी FRP सह विविध मागण्यांवरुन स्वाभिमानी आक्रमक, सांगली जिल्ह्यातल्या कारखान्यांवर काढली मोटसायकल रॅली
ऊस दराच्या मागणीसह विविध मागण्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
Swabhimani Shetkari Sanghatana : ऊस दराच्या मागणीसह विविध मागण्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली (Sangli) जिल्ह्यातील कारखान्यांवर धडक मोटसायकल रॅली काढली. एकरकमी एफआरपी (FRP) जाहीर करा, वजनातील काटामारी थांबवा, वजनकाटे ऑनलाईन करा, तोडणीचे पैसे बंद करा या मागण्यांसाठी ही रॅली काढण्यात आली. स्वाभिमानीचे जिल्हाअध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोटसायकल रॅली काढत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सर्व कारखानादारांना इशारा दिला आहे.
साखर कारखानदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी
स्वाभिमानीचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली उदगिरी कारखान्यापासून रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरोडेखोर साखर सम्राटाचे करायचे काय? खाली मुंडी वर पाय, मापात पाप नको वजनात चोरी नको, एकरकमी FRP जाहीर करा अन्यथा खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी कारखण्याच्या अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं. दरम्यान, बामणी, मंगरुळ करवे, धामणी, पाडली, नरसेवाडी, कचरेवाडी, धोंडेवाडी, विजयनगर आदी गावात लवकर टोळ्या द्याव्यात, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळं द्राक्ष बागा आणि अन्य पिकांचं नुकसान होते आहे. त्यामुळं राखेचा बंदोबस्त करावा. त्याचबरोबर एकरकमी FRP तातडीनं जाहीर करावी. कोणीही कुटूनही वजन करुन आणल्यास ऊस गाळप केला जाईल असे जाहीर करावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतो असे कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सांगतिले आहे. उदगिरी कारखान्यापासून पुढे रॅली विराज खंडसारीवर गेली. तिथेही निवेदन देऊन याच मागण्यासंदर्भात चर्चा केली. तिथून रॅली क्रांती कारखान्यावर आली. त्या ठिकाणी आदोलकांसमोर खराडे यांनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर सोनहिरा साखर कारखान्यावर रॅली काडण्यात आली. त्याठिकाणी रॅलीची सांगता झाली.
जिल्ह्यात दत्त इंडिया वगळता कोणत्याही कारखान्यानं एकरकमी FRP जाहीर केली नाही
शनिवारी (5 नोव्हेंबर) सकाळी नऊ वाजता सर्वोदय कारखान्यावरुन रॅलीला सुरुवात होणार आहे. तिथून हुतात्मा वाळवा, राजाराम बापू साखरालेमार्गे विश्वास चिखली तसेच नीनाई कोकरुड कारखान्यावर रॅली जाणार आहे. तिथे रॅलीची सांगता होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बहुंताश कारखान्यांनी एकरकमी FRP जाहीर केली आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात दत्त इंडिया वगळता कोणत्याही कारखान्यानं एकरकमी FRP जाहीर केलेली नाही.
राजकारण बाजूला ठेवून आपल्या हितासाठी एकत्र या
कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांना जे जमते ते सांगली जिल्ह्यात का जमत नाही? असा सवालही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला. कारखानदारांनी लवकरात लवकर एकरकमी FRP देण्याचा निर्णय घ्यावा.
ऊसाच्या वजनातील काटामारी थांबवावी. 13 ते 14 टक्के काटामारी होते. ती बंद झाली पाहिजे. तोडीणीसाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जातात, ते बंद झाले पाहिजेत. तोडणीसाठी कारखाने ऊस बिलातून पैसे कपात करतात आणि मजुरांनांही पैसे मोजावे लागतात ही शोकांतिका आहे. यासह अन्य मागण्यांसाठी ही रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत राजकारण बाजूला ठेवून आपल्या हितासाठी, आपल्या फायद्यासाठी एक दिवस खर्च करावा. जेवढे शेतकरी मोठ्या संख्येने रॅली मध्ये सहभागी होतील, तेवढा जास्त दबाव कारखांनदारांवर निर्माण होईल. तरच कारखानदार झुकतील अन्यथा, त्यांचा मनमानी कारभार सुरुच ठेवतील. शेतकऱ्यांनी येताना चटणी-भाकरी घेवून यावं असे आवाहन यावेळी महेश खराडे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: