Sugar Export : केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर एक वर्षासाठी बंदी, मात्र, 'या' देशांमध्ये निर्यातीसाठी सूट
साखरेच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं साखर निर्यातीवरील बंदी एक वर्षासाठी वाढवली आहे.
Sugar Export : केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीबाबत (Sugar Export) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साखरेच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारनं निर्यातीवरील बंदी एक वर्षासाठी वाढवली आहे. आता साखर निर्यातीवरील बंदी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. मात्र, यातून काही देशांना सूट देण्यात आली आहे. युरोपियन युनियन (EU) आणि यूएस (US) मधील निर्यातीवर निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत. या दोन्ही ठिकाणी साखरेच्या निर्यातीला परवानगी असणार आहे. यामुळं देशात साखर महाग होणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
2021-22 मध्ये भारताची साखर निर्यात 57 टक्क्यांनी वाढली
भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे. भारतातील साखरेच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं ऑक्टोबर 2023 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. येत्या काही वर्षांत भारतातील ऊसाचे उत्पादन झपाट्याने वाढेल, अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे. साखर उत्पादनात भारत जगात पहिले स्थान कायम ठेवेल असेही सरकारनं म्हटलं आहे. त्यामुळं भारताची साखर निर्यात 2021-22 मध्ये 57 टक्क्यांनी वाढून 109.8 लाख टन झाली आहे.
31 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत बंदी
केंद्र सरकारनं 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) आता एक वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. आता 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी असणार आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने एक अधिसूचना जारी करुन याबाबतची माहिती दिली आहे. कच्च्या, शुद्ध आणि पांढर्या साखरेच्या निर्यातीवरील निर्बंध 31 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत वाढवण्यात आले आहेत.
2021 ते 2022 मध्ये 394 लाख टन साखरेचं उत्पादन
युरोपियन युनियन (EU) आणि यूएस (US) मधील देशांमध्ये साखर निर्यात करता येणार आहे. त्यामुळं देशात साखरेच्या किंमती नियंत्रीत राहणार आहेत. या दोन बाजारपेठांमध्ये विशिष्ट प्रमाणात साखर निर्यात केली जाणार आहे. 2021 ते 2022 दरम्यान, देशात साखर कारखान्यांनी सुमारे 3 हजार 574 लाख टन ऊसाचं गाळप करुन सुमारे 394 लाख टन साखरेचं उत्पादन केले. यापैकी 359 लाख टन साखर कारखान्यांनी तयार केली. तर 35 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळवण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. दरम्यान, परदेशात साखर पाठवत राहिल्यास आपल्या देशात साखरेचा तुटवडा निर्माण होईल, असे केंद्र सरकारला वाटत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे साखर महागणार आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. त्यामुळेच सरकारनं निर्यातीवर बंदी घातल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
महत्त्वाच्या बातम्या: