Success Story: जांभळ्या वांग्याच्या शेतीत 8 लाख कमावले, पुण्याच्या जोडप्यानं एकरभरात मोठं यश, नक्की केलं काय?
प्रशांत आणि प्रिया यांनी त्यांच्या शेतीत 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि त्याला 50 टन उत्पादनाची अपेक्षा आहे.
Success Story: वांग्याच्या शेतीतून किती कमाई होऊ शकते? कोणी म्हणेल काही हजार मिळत असतील. पण एकरभरातून पुण्याच्या शेतकरी जोडप्यानं जांभळ्या वांग्यांच्या लागवडीतून लाखो कमावलेत. पुण्यातील दौंडच्या एका शेतकरी जोडप्यानं पारंपरिक पिकांना फाटा देत भाजीपाला पिकातून चांगली कमाई केली आहे. एकरभरात जांभळ्या वांग्याच्या लागवडीसाठी 2 लाख रुपये खर्च केल्यानंतर खर्च वगळून या जोडप्यानं आठ लाखांचा नफा केलाय. शहरातील हॉटेल्समध्येहीही ते आपल्या शेतातली वांगी पुरवतात. (Brinjal Farming)
इतर वांग्यांच्या तुलनेत चव वेगळी
दौंड तालुक्यातील प्रशांत आणि प्रिया जगताप हे एक प्रेरणादायी जोडपे आहेत. त्यांनी एक एकर जमिनीवर जांभळ्या वांग्याची लागवड करून एक नवा प्रयोग केला आहे. शहरातील हॉटेल्समध्ये प्रचंड मागणी असलेल्या या वांग्याची किंमत बाजारात 15 ते 25 रुपये प्रतिकिलो आहे. इतर वांग्यांच्या तुलनेत त्याची चव वेगळी असल्याने, त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. (Pune farming Success)
2 लाखांची गुंतवणूक, 8 लाखांचा नफा
प्रशांत आणि प्रिया यांनी त्यांच्या शेतीत 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि त्याला 50 टन उत्पादनाची अपेक्षा आहे. जर सध्याचा बाजारभाव कायम राहिला, तर त्यांना आठ लाख रुपयांचा नफा मिळवता येईल.दौंड तालुका ऊस लागवडीसाठी प्रसिद्ध आहे, पण जगताप कुटुंबाने भाजीपाला शेतीत देखील आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या 19 एकर शेतात त्यांनी उसासोबत पालेभाज्या आणि फळांची बागाही लावली आहे. यापूर्वी 3,200 जांभळ्या वांग्याच्या रोपांची विक्री नारायणगाव येथून 7 रुपयांप्रमाणे केली होती. योग्य व्यवस्थापन, सिंचनाची सोय पाहिल्यानं या शेतकरी जोडप्याला चांगलं उत्पन्न मिळालंय.
तीन दिवसांनी सरासरी 1.5 ते 2 टन उत्पादन
1 डिसेंबरपासून वांग्याची कापणी सुरू झाली, आणि दर तीन दिवसांनी सरासरी 1.5 ते 2 टन उत्पादन मिळते. अद्याप 10 कापणीचे काम पूर्ण झाले असून, उत्पादन पुण्याच्या गुलटेकडी आणि वाशी बाजारपेठांमध्ये पाठवले जात आहे. प्रत्येक वांग्याचे वजन 300 ते 400 ग्रॅम असते.वांग्याच्या शेतीतून लाखोंचा नफा मिळवणारे जगताप कुटुंब हे निश्चितच भविष्यातील शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणा ठरले आहे. शेतीमध्ये नवे प्रयोग, योग्य मार्गदर्शन आणि कुटुंबाच्या सहकार्याने यश मिळवता येते, हे जगताप कुटुंबाच्या यशाने सिद्ध केले आहे!
हेही वाचा:
Success story: ऊसाला फाटा देऊन 2.5 एकरात फुलवला आल्याचा मळा! नगरचा शेतकरी मिळवतोय 15 लाखांचे उत्पन्न
शुन्याऐवजी इंग्रजीतला 'o' मारला..एका चुकीनं सोयाबीनची रक्कम अडकली, शेकडो शेतकऱ्यांवर नामुष्की