Strawberry Farming : हिवाळ्यात 'स्ट्रॉबेरी' पिकातून मिळवा लाखोंचा नफा, कसं कराल स्ट्रॉबेरी शेतीचं नियोजन?
Strawberry Farming : थंडीच्या दिवसात तुम्ही स्ट्रॉबेरीची लागवड (Strawberry Farming) करुन चांगले उत्पादन घेऊन शकता. थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असते.
Strawberry Farming : देशातील अनेक राज्यात थंडीचा कडाका (Cold Weather) वाढला आहे. या थंडीच्या दिवसात तुम्ही स्ट्रॉबेरीची लागवड (Strawberry Farming) करुन चांगले उत्पादन घेऊन शकता. थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असते. आता स्ट्रॉबेरीची शेती फक्त डोंगराळ भागात किंवा थंड प्रदेशापुरती मर्यादित राहिली नाही. तर मैदानी भागातही योग्य नियोजन केल्यास स्ट्रॉबेरेची शेती करता येते. या पिकातून आपल्याला चांगला नफाही मिळवता येतो. तर याच स्ट्रॉबेरीच्या शेतीबाबतची सविस्तर माहिती पाहुयात...
आज मोठ्या शहरांपासून छोट्या शहरांमध्ये स्ट्रॉबेरी सहज उपलब्ध होतात. सध्या सगळीकडे स्ट्रॉबेरीच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. चविष्ट स्ट्रॉबेरी पिकवून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. स्ट्रॉबेरी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरीमध्ये 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांसाठी स्ट्रॉबेरी खाणं फायदेशीर आहे. तसेच स्ट्रॉबेरीमध्ये सायट्रीक आम्ल आणि आरोग्यास आवश्यक आम्ल मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळं हिवाळ्यात स्ट्रॉबेरीच्या मागणीत वाढ होते.
स्ट्रॉबेरीच्या जाती
जगात स्ट्रॉबेरीच्या सुमारे 600 जाती आहेत. त्यापैकी कॅमरोसा, चांडलर, ऑफरा, ब्लॅक पीकॉक, स्वीडन चार्ली, एलिस्टा आणि फेअर फॉक्स या जातींच्या स्ट्रॉबेरीची भारतात लागवड केली जाते. या जातींच्या स्ट्रॉबेरीची शेतात लागवड केल्यानंतर 40 ते 50 दिवसांत पीक तयार होते.
कशी कराल लागवड
स्ट्रॉबेरी लागवड करण्यासाठी सुरुवातीला शेतात बेड तयार करा. त्यावर मल्चिंग पेपर टाकून ठिबक सिंचनाची व्यवस्था करा. रासायनिक खतांचा वापर करण्याऐवजी शेणखत आणि गांडूळ खताचा वापर करा. त्यामुळे स्ट्रॉबेरी लागवडीचा खर्च कमी होऊन नफा वाढेल.
या राज्यांमध्ये स्ट्रॉबेरीची होते लागवड
स्ट्रॉबेरीची लागवड फक्त रब्बी हंगामात केली जाते. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये पिकणारी स्ट्रॉबेरी आता उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये पिकवली जाते. स्ट्रॉबेरीची लागवड करण्यापूर्वी आधी मातीची चाचणी घ्या, जेणेकरून माती आणि हवामान स्ट्रॉबेरीसाठी योग्य का? हे समजेल. तसेच अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही माहिती घेऊ शकता.
1 एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीच्या 22 हजार रोपांची लागवड
स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू शकतात. मात्र, यासाठी चांगले तंत्रज्ञान, चांगल्या जातीचे बियाणे, चांगली निगा, स्ट्रॉबेरीची माहिती, विपणन याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. स्ट्रॉबेरी हे केवळ फळ म्हणून बाजारात विकले जात नाही. तर त्यापासून तयार केलेले खाद्यपदार्थही खूप प्रसिद्ध आहेत. ब्युटी प्रोडक्ट्समध्येही त्याचा वापर होत आहे. तज्ज्ञांच्या मते, 1 एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीच्या 22 हजार रोपांची लागवड करता येते. स्ट्रॉबेरीची लागवड केल्यानंतर 50 दिवसांनंतर, दररोज 5 ते 6 किलो उत्पादन मिळते. प्रत्येक झाडातून 500 ते 700 ग्रॅम उत्पादन मिळू शकते. एका हंगामात 80 ते 100 क्विंटल स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या: