Plastic Flowers : प्लॅस्टिक फुलांची विक्री बंद करा, शेतकऱ्याची हरित लवादाकडे याचिका, न्यायालयानं घेतली दखल
प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदी आणावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खुटबाव येथील शेतकरी राहुल पवार यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे.
Plastic Flowers : सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक फुले (Plastic Flowers) विक्रीसाठी येत आहेत. ही फुलांची चीनमधून (China) मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे. तर राज्यातही काही ठिकाणी प्लॅस्टिक फुलं तयार केली जात आहेत. याचा खूप मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. तर दुसरीकडे पर्यावरणाची देखील हानी या फुलांमुळे होत आहे. त्यामुळं प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदी आणावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खुटबाव येथील शेतकरी राहुल पवार यांनी हरित लवादाकडे (National Green Tribunal) याचिका दाखल केली आहे. या याचिकेची हरित लवादाने दखल घेतली आहे.
पर्यावरणाची हानी आणि शेतकरी नुकसान यावर युक्तीवाद
शेतकरी बांधवानी उभी केलेली प्लॅस्टिक फुल बंद चळवळ आता हरित लवादाकडे दाखल करण्यात आली आहे. मोहिमेतील दुसरा टप्पा चालू झाला आहे. पर्यावरणाची हानी करणाऱ्या आणि फुल उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या प्लॅस्टिक फुलांच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवाद यांच्या पुणे न्यायालयासमोर याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने दाखल करुन घेतल्याची माहिती याचिकाकर्ते शेतकरी राहुल पवार यांनी दिली आहे. न्यायालयासमोर जाण्याआधी आपण प्लॅस्टिक फुलांच्या पर्यावरणीय बाजूने विविध चाचण्या करुन घेतल्या होत्या. तसेच तज्ज्ञांचे अभिप्राय घेतले होते. न्यायालयात पर्यावरणाची हानी आणि शेतकरी नुकसान या दोन्ही मुद्द्यांवरती युक्तिवाद झाले होते. प्लॅस्टिक फुले ही सिंगल युज प्लॅस्टिक बंदीच्या कायद्यात येऊन पूर्णपणे बंद झाली पाहिजेत या आमच्या मागणीला न्यायालयानं संमती दर्शवून मॅटर ऍडमिट करून संबंधित विभागांना नोटीस काढली होती. तसेच पुढील सुनावणी वेळी त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. तसेच या मुद्द्याला अनुसरुन संपूर्ण भारतात ही बंदी असावी ही मागणीही न्यायालयाने मान्य केल्याची माहिती राहुल पवार यांनी दिली आहे. राष्ट्रीय हरित लवादासमोर शेतकऱ्यांच्या बाजूने अॅड. डॉ. सुधाकर आव्हाड, अॅड. चेतन नागरे आणि अॅड. सिद्धी मिरघे यांनी बाजू मांडली. प्लॅस्टिक फुल बंदी चळवळीतील कायदेशीरपणे बंदी हा दुसरा टप्पा होता. याचबरोबर शासकीय स्तरावरसुद्धा प्रयत्न चालू असल्याचे पवार म्हणाले.
150 रुपयांचा दर 40 रुपयांवर आला
मी गेल्या आठ वर्षापासून फुलांची शेती करत आहे. मात्र यावर्षी खूप मोठा फटका बसला आहे. नैसर्गिक फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली आहे. याचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचे मत शेतकरी राहुल पवार यांनी व्यक्त केलं. मागील दोन वर्षापासून बाजारात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकची फुले येत आहेत. नैसर्गिक फुलांना 125 ते 150 रुपयांचा मिळणारा दर या प्लॅस्टिकच्या फुलामुळं आता 30 ते 40 रुपयांवर आला असल्याचे राहुल पवार यावेळी म्हणाले. दुसरीकडे या फुलांमुळं पर्यावरणाची मोठी होनी होते. त्यामुळं या फुलांवर बंदी येण गरजेचं असल्याचे राहुल पवार यांनी सांगितले. याबाबत आम्ही हरित लवादाकडे तक्रार दाखल केली होती. कोर्टाकडे सगळे रिपोर्ट सादर केले होते. सिंगल युजच्या कायद्यामध्ये याचा समावेश करावा अशी मागणी केली होती. कोर्टाने आमचे म्हणणे मान्य केलं आहे. तसेच याबाबत कोर्टाने पर्यावरण मंत्रालय तसेच प्रदुषण मंडळाला आपलं म्हणणे मांडण्यास सांगितल्याची माहिती राहुल पवार यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: