Sangli : कडेगावच्या युवा शेतकऱ्याची यशस्वी शेती! आलं आणि ड्रॅगन फ्रुटमधून मिळणार अडीच कोटींचं उत्पन्न
Sangli News : कडेगाव तालुक्यातील वांगी येथे राहणाऱ्या युवा शेतकऱ्याने आले आणि ड्रॅगन फ्रुटची यशस्वी शेती केली आहे, यातून त्याला अडीच कोटींचं उत्पन्न मिळणार आहे.
Sangli Farmer Success Story : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी येथील युवा शेतकऱ्याने यशस्वी शेती केली आहे. 20 ते 22 एकरमध्ये केलेल्या आले (Ginger) पिकामधून दोन कोटींचं, तर पाच एकरवर केलेल्या ड्रॅगन फ्रुटमधून (Dragon Fruit) 60 ते 70 लाखांचं उत्पन्न हा शेतकरी घेणार आहे. स्वप्निल जयवंतराव देशमुख असं या युवा शेतकऱ्याचं नाव आहे.
एमबीए झालेला तरुण वळला शेतीकडे
स्वप्निल हा तसा उच्चशिक्षित तरुण. तो सिम्बॉयसिस कॉलेजमधून एमबीए (MBA) झाला आहे. परंतु नोकरीच्या मागे न लागता त्याने स्वत:च्या शेतीत राबणं पसंत केलं आहे आणि याचा त्याला भला मोठा फायदा देखील झाला आहे. त्याला त्याचे आई-वडील आणि बायकोचीही यात मोठी साथ लाभली. त्याची बायको देखील उच्चशिक्षित असली तरी ती स्वप्निलला शेती करण्यात मदत करतेय. या सर्वांच्या जोरावर त्यांनी आलं आणि ड्रगॅन फ्रुटची यशस्वी शेती केली आहे.
आलं आणि ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून मिळणार भरघोस उत्पन्न
सध्या आल्याचे भाव हे चांगले असल्याने त्यांना या आलं (Ginger) पिकातून तब्बल दोन कोटींचं निव्वळ उत्पन्न मिळण्याचा विश्वास आहे. स्वप्निलने सेंद्रीय शेती (Organic farming) करताना त्यांना खतं (Fertilizer), औषधं कशी द्यायची याचं योग्य नियोजन केलं असून दर सातव्या दिवशी देशी गाईचं गोमुञ, गुळ आणि इतर पदार्थांचं मिश्रण करुन स्लरी करुन तो पिकांना देत असल्याचं त्याने सांगितलं. स्वप्निलचे वडील जयवंतवराव देशमुख हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत, त्यांना त्यांच्या मुलाच्या कतृत्वाचा खूप अभिमान आहे. तेही न चुकता आपल्या शेतीतून फेरफटका मारतात आणि परिस्थितीची पाहणी करतात.
उच्च शिक्षित बायकोकडूनही मदतीचा हात
स्वप्निलची बायको उपासना ही देखील त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करते. तिनेही या शेतीची देखभाल ठेवली आहे. तीदेखील स्वप्निलला हातभार लावत तिच्या अनुभवाचा फायदा शहरी भागातून करुन देण्याचा प्रयत्न करत आहे. शहरात ड्रॅगन फ्रुटला सर्वात जास्त मागणी असते, त्यामुळे घरच्या पाच एकर शेतीतील एक एकरात त्यांनी सर्वात जास्त मागणी असणारं ड्रॅगन फ्रुटचं पीक घेतलं आहे.
एकीकडे टॉमेटोचे भाव आता वाढले असल्याने टोमॅटोला चांगले दर मिळाले आहेत. आता यात आल्याची शेती देखील वाढत असून आले शेतीतून चांगला पैसा शेतकऱ्यांच्या हाती पडत आहे.
हेही वाचा :
Latur Tomato Farmer: लातूरचे शेतकरी बंधू टोमॅटोतून बनणार कोट्यधीश! दर वाढल्याचा जबरदस्त फायदा