सहा रबी पिकांचा MSP वाढवला, गव्हाच्या किमतीत 110 रुपयांची तर मसूरमध्ये 500 रुपयांची वाढ; कॅबिनेटचा निर्णय
Rabi Crops MSP: गहू, मसूरसह सहा पिकांच्या किमान हमी भावात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने येत्या रबी पिकांचे किमान हमी भाव म्हणजे एमएसपी जाहीर केले आहेत. गव्हाची एमएसपी 2015 रुपयांवरुन 2125 क्विंटल म्हणजे 110 रुपयांनी वाढवली आहे. तर हरभऱ्याचा एमएसपी 1635 वरुन 1735 म्हणजे 105 रुपयांनी वाढवण्यास केंद्रिय कॅबिनेटने मान्यता दिली आहे.
गहू, हरभऱ्याप्रमाणेच इतर महत्वाच्या सहा रबी पिकांचा एमएसपी वाढवला आहे. मसूरचा एमएसपी सर्वाधिक 500 रुपये वाढून 6 हजार रुपये क्विंटल झाली आहे. तर मोहरीचा एमएसपी 400 रुपयांनी वाढवला आहे. करडईचा एमएसपी 5 हजार 441 होता. तो 209 रुपयांनी वाढून 5 हजार 650 रुपये क्विंटल झाली आहे.
किसान हितों को प्राथमिकता देते हुए कल, ₹16000 करोड़ की सम्मान निधि की 12वीं क़िस्त के बाद आज PM श्री @narendramodi जी की अध्यक्षता में #cabinet ने रबी विपणन सत्र 2023-24 के लिए सभी अधिदेशित रबी फसलों के लिए न्यूनतम समर्थन मूल्य #MSP में वृद्धि को दी मंजूरी।#MSPHaiAurRahega pic.twitter.com/YbtMqfYT3T
— Narendra Singh Tomar (@nstomar) October 18, 2022
सन 2023-24 सालासाठी सहा रबी पिकांच्या किमान हमी भावाच्या वाढीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितलं. त्यानुसार मसूरच्या किमतीत दर क्विंटलमागे 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर गव्हाच्या किमतीत 110 रुपायांची वाढ करण्यात आली आहे. चना किमतीत 105 रुपयांची तर मोहरीच्या किमतीत 400 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या पिकांच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे.
एमएसपी म्हणजे काय?
एमएसपी (MSP) म्हणजे किमान हमी भाव किंवा किमान आधारभूत किंमत. या किमतीला सरकार शेतकऱ्यांकडून त्यांच्या पिकांची खरेदी करतं. एकदा का एखाद्या पिकाला किमान हमी भाव जाहीर केला तर त्या किमतीखाली त्या पिकाची खरेदी करता येत नाही. किमान तेवढ्या किमतीला संबंधित पीक खरेदी करणं सरकारला बंधनकारक असतं. किमान हमीभावामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचं आश्वासन मिळतं, दिलासा मिळतो.
एमएसपी कोण ठरवतं?
खरीप आणि रबी पिकाचा एमएसपी वर्षातून दोनदा ठरवला जातो, कृषी खर्च आणि किमती आयोग म्हणजे सीएसीपी या संबंधित केंद्र सरकारकडे शिफारस करतो. त्या आधारे दरवर्षी तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया आणि आणि इतर पिकांचा एमएसपी घोषित केला जातो. या शिफारशी लक्षात घेऊन सरकार एमएसपी जाहीर करते.
किती पिकांसाठी एमएसपी जाहीर केला जातो?
CACP कडून सध्या 23 पिकांसाठी एमएसपी जाहीर केला जातो. त्यामध्ये 7 अन्नधान्य पिके, 5 डाळी, 7 तेल बिया आणि 4 व्यावसायिक पिकांसाठी सध्या एमएसपी जाहीर केला जातोय.