Pune : पुण्यातील शेतकऱ्यानं चक्क घराच्या टेरेसवर फुलवली द्राक्षाची बाग; युरोप ट्रिपमुळे सुचली भन्नाट कल्पना
Pune : उरळीकांचन गावात एका शेतकऱ्याने दोन मजली बंगल्याच्या टेरेसवर चक्क द्राक्षाची बाग फुलवली.
Pune : द्राक्ष शेतात पिकवली जातात हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु हीच द्राक्ष एखाद्या घराच्या गच्चीवर पिकवली जातात म्हटलं तर कुणाचा विश्वास बसेल का ? असं प्रत्यक्षात घडलय. पुण्यापासून 30 ते 35 किमी अंतरावर असणाऱ्या उरळीकांचन गावात एका शेतकऱ्याने दोन मजली बंगल्याच्या टेरेसवर चक्क द्राक्षाची बाग फुलवली.
उरुळी कांचन परिसरात राहणारे 58 वर्षीय भाऊसाहेब कांचन त्यांचा पारंपरिक शेती व्यवसाय आहे. उरुळी कांचन परिसरात त्यांची सव्वा तीन एकर शेती आहे. त्यांनी दोन एकरात ऊस, तर दहा गुंठ्यात नारळ, सुपारी, आवळा, जांभूळ, पेरू, आंबा, डाळिंब, चिकू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची त्यांनी लागवड केली. कांचन यांनी साधारण सहा वर्षांपूर्वी घराच्या बाजूला द्राक्षाच्या दोन रोपांची लागवड केली होती. त्यानंतर त्यांनी टेरेसवरच द्राक्षाची बाग फुलवली.
युरोप दौऱ्यावर असताना सुचली ही भन्नाट कल्पना
भाऊसाहेब कांचन 2013 मध्ये शेतकरी सहलीच्या निमित्ताने युरोप दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी युरोपात हजारो एकर वर फुललेली द्राक्ष शेती पाहिजे. अनेक घरासमोर घराच्या टेरेसवर द्राक्षाच्या बागा लगडताना पाहिल्या. हे सर्व युरोपात होऊ शकते तर कृषिप्रधान देश म्हणून ओळख असणार्या भारतात हे का होऊ शकत नाही? असा प्रश्न त्यांना पडला. त्यानंतर आपणही अशाच प्रकारे द्राक्षाचे उत्पन्न घेऊ अशी खूणगाठ मनाशी बांधूनच ते भारतात परतले.
भाऊसाहेब कांचन यांनी त्यांच्या द्राक्षाच्या बागेबद्दल सांगितलं, 2015 साली कांचन परिसरात असलेल्या शेतालगत त्यांनी घराचं बांधकाम सुरू केले. बंगल्याचे बांधकाम सुरू असतानाच त्यांनी या बंगल्याच्या भिंतीलगत द्राक्षाचे रोप टाकलं. मांजरीतील द्राक्ष संशोधन संस्थेतून त्यांनी मांजरी मेडिका जातीचं हे रोप आणलं होतं. हळूहळू ही वेळ वाढत गेली.. साडेतीन वर्षानंतर ही वेळ हळूहळू बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर गेली. तोपर्यंत कांचन यांनी या वेलीला अगदी एखाद्या लहान बाळा प्रमाणे सांभाळले. बंगल्याच्या गच्चीवर यावेळी साठी मांडवा सारखा आधार तयार केला. संपूर्ण मांडवभर या वेली पसरल्या होत्या. 2019 पासून या वेलीवर द्राक्षाची घडं दिसू लागली. हळूहळू ही घडं वाढत गेली आणि आता भाऊसाहेब कांचन यांची गच्ची द्राक्षांचा घडांनी उलगडून गेली आहे. ही संपूर्ण भाग फुलवण्यासाठी त्यांना सहा हजार रुपयांचा खर्च आला आहे.आता या गचीत गेल्यानंतर आपण एखाद्या द्राक्षाच्या बागेत उभे आहोत की काय असाच फील येतो.'
भाऊसाहेब कांचन यांच्या घरात येणाऱ्या पाहुण्यांना देखील सर्वात आधी गच्चीवर जाऊन ही द्राक्षांची बाग दाखवतात. त्यामुळे घरात कधीकाळी पाहुणे आले तर ते सर्वात आधी गच्चीवर जाण्याचा प्रयत्न करतात. ही बाग फुलवण्यासाठी भाऊसाहेब यांच्याबरोबरच त्यांची पत्नी आणि मुलांनी देखील हातभार लावला..कांचन यांची मुलं जेव्हा मित्रांकडे, नातेवाईकांकडे जातात तेव्हा याच बागेतील द्राक्ष भेट म्हणून घेऊन जातात.
संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने फुलवलेल्या या बागेतील द्राक्ष भाऊसाहेब कांचन आणि कधी विक्रीसाठी काढली नाहीत. ही बाग आणि बागेतील द्राक्ष म्हणजे त्यांच्यासाठी आता जिव्हाळ्याचा विषय झालाय. मित्र-मैत्रिणी नातेवाईक पाहुण्यांना या बागेतील द्राक्ष खायला देतात. अशा प्रकारची भाग त्यांच्याकडील कशी पुरवता येईल यासाठी ते त्यांना मार्गदर्शन करत असतात..
स्वतःच्या मनाशी निश्चय करून एखादी असाध्य गोष्ट साध्य करण्याची ठरवलं तर ते सहजरीत्या करू शकतात हेच भाऊसाहेब कांचन यांनी द्राक्षाची बाग उभारून दाखवून दिले आहे. अशीच बाग जर आणखी कुणाला उभारायची असेल तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाऊसाहेब तयार आहेत. यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात यावा असे आवाहनही त्यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या:
काढायलाही परवडत नाही म्हणून झाडावरच पिकतायेत केळी! शेतकरी हवालदिल; केळीच्या बागा केल्या उध्वस्त
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha