Onion Price News : कांद्याला प्रती किलो 30 रुपयांचा दर द्या, अन्यथा नाफेडकडून होणारी कांद्याची खरेदी बंद पाडू : भारत दिघोळे
नाफेडकडून 7 ते 9 रुपये प्रती किलो दराने कांद्याची खरेदी केली जात आहे. हा कांद्याला मिळणारा दर कमी आहे. त्यामुळं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
Onion Price News : गेल्या दोन दिवसापासून लासलगाव बाजार समितीमध्ये नाफेडकडून कांदा खरेदीली सुरुवात करण्यात आली आहे. नाफेडकडून 7 ते 9 रुपये प्रती किलो दराने कांद्याची खरेदी केली जात आहे. हा कांद्याला मिळणारा दर कमी आहे. त्यामुळं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला किंमत देणार नसाल तर कांदा खरेदी बंद पाडू असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याला प्रती किलो 30 रुपयांचा दर द्यावा अशी मागणी दिघोळे यांनी केली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजार समिती म्हणून लासलगाव बाजार समितीची ओळख आहे. मोठ्या प्रमाणात कांद्याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार याठिकाणी होतात. सध्या नाफेडकडून कांद्याची कमी दरात विक्री होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. सध्या कांद्याला 7 ते 9 रुपये प्रती किलो दर मिळतोय. अशा स्थितीत केंद्र सरकार कांदा खरेदीबाबत कोणता निर्णय घेऊ शकत नाही. केंद्र सरकार जर याबाबत कोणता निर्णय घेत नसरेल तर नाफेडलाही बाजार समितीतून कांदा खरेदीचा अधिकार नसल्याचे दिघोळे म्हणाले.
दरम्यान, 2019 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे सांगितले होते. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु असे आश्वासन दिले होते. पण उत्पन्न दुप्पट करणे किंवा सातबारा (7/12) कोरा करणे हे दूरच आहे. सध्या शेती निवीष्ठांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शेतकऱ्यांवरील कर्जाचे ओझे वाढत आहे अशा स्थितीत शेतमाल कमी दरात विक्री होत असल्याचे दिघोळे म्हणाले. गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी कमी दरात कांदा विकत आहेत. उत्पादनासाठी मोठा खर्च आहे. अशातच 8 ते 9 रुपये दराने कांद्याची खरेदी केली जातेय. याकडे ना राज्य सरकारचे लक्ष आहे, ना केंद्र सरकारचे. शेतकरी मात्र, आर्थिक संकटात जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याला प्रती किलो 30 रुपयांचा दर द्या अन्यथा खरेदी बंद पाडू असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं दिला आहे. त्यामुळे आता या इशाऱ्यानंतर कांद्याच्या दरात वाढ होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: