Navdurga 2025 : संसाधन कमी, पण जिद्द अन् कल्पकतेने मिळवलं लाखोंचं उत्पन्न; दिपाली खुर्दळ यांची प्रेरणादायी कहाणी, शेतीतील नवदुर्गेला सलाम
Navdurga 2025 : कमी शेतीत भरघोस उत्पन्न मिळवणं हे फक्त स्वप्न नाही, तर वास्तव आहे. योग्य नियोजन, कल्पकता आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दिपाली खुर्दळ यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे.

Navdurga 2025 : वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी लग्न करून खतवड येथे आलेल्या दिपाली खुर्दळ यांनी एकत्र कुटुंबात शेतीत काम करायला सुरुवात केली. वडील गेल्याने कुटुंबावर आर्थिक संकट आलं आणि नववीतच त्यांना शाळा सोडावी लागली. लहानपणीच त्या घरच्यांसोबत शेती कामात पडल्या. त्यामुळे सासरी त्यांना शेती कामात अडचण आली नाही. आज त्या त्यांच्या पतीसोबत 5 एकर शेती करतात. ज्यात 2.5 एकर स्वतःची आणि 2.5 एकर बटाईने (भाड्याने) घेतलेली आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलाला कृषी क्षेत्राचे शिक्षण घेऊन शेतीतच काम करण्याची इच्छा आहे हे पाहून दिपाली यांना आनंद होतो. कारण त्यांचा संघर्ष आता त्यांच्या पुढील पिढीला मार्ग दाखवत आहे.
2018 साली त्यांच्यावर मोठं संकट आलं. मुलगी अचानक आजारी पडली आणि त्याचवेळी सासऱ्यांनाही हार्ट अटॅक आला. या दुहेरी संकटाने त्यांची आर्थिक परिस्थिती डगमगली. पण त्या खचल्या नाहीत. या अनुभवातून त्यांना पैशांच्या योग्य नियोजनाचं महत्त्व समजलं आणि त्यांनी आर्थिक शिस्त पाळायला सुरुवात केली. कमी शेती असूनही जास्त उत्पन्न कसं काढायचं, याचा त्यांनी विचार केला. याच विचारातून त्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग सुरू केले. त्यांचे प्रयोग इतके यशस्वी झाले की इतर शेतकरीही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ लागले. यात त्यांच्या पतीची त्यांना खंबीर साथ मिळाली.
अभिनव पद्धतीने स्वीटकॉर्नची लागवड (Dipali Khurdal Success Story)
2022 मध्ये त्यांनी अॅडव्हांटा कंपनीच्या गोल्डन हनी वाणाच्या स्वीटकॉर्नची लागवड अभिनव पद्धतीने केली. एरवी दोन फुटांच्या सऱ्यांमध्ये लावला जाणारा स्वीटकॉर्न त्यांनी पूर्वी घेतलेल्या टोमॅटोच्या बेडवर 'झिग-झॅक' पद्धतीने लावला. यामुळे त्यांचा जमीन तयार करण्याचा खर्च वाचला तसेच टोमॅटोच्या वेस्टमधून पोषक द्रव्यही मिळाले. एकरा मागे होणारा 15 हजाराचा खर्च वाचला. त्यांच्या या प्रयोगाने उत्पन्नाचे सर्व विक्रम मोडीत काढले. साधारणपणे एकरी 7 ते 8 टन उत्पादन मिळतं, पण त्यांना तब्बल 10 टन उत्पादन मिळालं. त्या वर्षी त्यांनी एकर भर पिकातून 1 लाख 40 हजार रुपये कमावले. जपान आणि कॅनडाहून आलेल्या खरेदीदारांनी सुद्धा त्यांच्या शेतात भेट देऊन त्यांचे कौतुक केले.
आंतरपीक घेऊन दुहेरी फायदा (Dipali Khurdal Success Story)
दिपाली यांचे प्रयोग इथेच थांबले नाही. टोमॅटो लावताना त्यात भुईमूगचे आंतरपीक घेतात व दुहेरी फायदा मिळवतात. तसेच, टोमॅटोचं पीक 45 दिवसांचं झाल्यावर मंडपाचा उपयोग करून त्यात ते गिलकयाची लागवड करतात. त्यामुळे टोमॅटोचा हंगाम संपल्यावर लगेच गिलक्याचं उत्पादन सुरू होत आणि उत्पन्नाचा स्त्रोत कायम राहून भांडवल खेळतं रहाते. सोबतच त्यांची 2.5 एकर द्राक्षबागही असून त्यात ते चांगले उत्पन्न घेतात. गेल्या वर्षभराचा विचार केल्यास 180 क्विंटल द्राक्षातून 9 लाखांचे व टोमॅटोमधून 7 लाख असे एकूण 16 लाख रुपये कमावले आहेत. अल्पभूधारक असूनही त्यांनी उत्तम नियोजनाने चांगले आर्थिक उत्पन्न घेतले आहे.
उत्पन्नाला जोड देण्यासाठी सोलर ड्रायर प्रकल्प (Dipali Khurdal Success Story)
शेतीत त्या कल्पतेने काम करत आहेत. पण, द्राक्षाच्या पारंपरिक वाणांना सततच्या वातावरण बदलामुळे अडचणी येतात. म्हणून त्यांनी उत्पन्नाला जोड देण्यासाठी सोलर ड्रायर प्रकल्प सुरू केला. हा व्यवसाय सुरू करताना त्यांना कोणताही पूर्व अनुभव नव्हता. पण, त्यांनी मागे न हटता शिकायची तयारी दाखवली. त्यांनी 2024 साली 12 लाख रुपयांची गुंतवणूक करून सोलार ड्रायर प्रकल्प उभारला. त्यासाठी बँके कडून 5 लाखांचे कर्ज देखील घेतले. सह्याद्री फार्म्समध्ये 10 दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्यात त्यांनी ड्रायरचा व्यवसाय कसा करावा. नफ्या तोट्याची गणिते, व्यवस्थापन आणि व्यवसायाचे तंत्र समजून घेतलं आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करत त्यांनी हा प्रकल्प यशस्वी करून दाखवला. यात त्यांनी बेदाणे, आले आणि टोमॅटोवर प्रक्रिया करून मोठा नफा मिळवला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या कामासाठी त्यांनी कुठलाही मजूर न लावता कुटुंबाच्या मदतीने काम पूर्ण करून खर्चातही बचत केली. या वर्षी त्यांनी प्रक्रिया केलेल्या शेतमालातून 7.48 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आणि त्यातून 2.18 लाख रुपयांचा नफा कमावला व त्या बँकेच्या कर्जाची नियमित परतफेड देखील करत आहेत.
जिद्द अन् कल्पकतेने मिळवलं यश (Dipali Khurdal Success Story)
दिपाली त्यांच्या प्रयत्नांतून त्या सिद्ध करतात की, संसाधन आणि शेती कमी असली तरी चातुर्य, कल्पकता आणि कठोर परिश्रमाने यश मिळवता येतं. त्यांची ही कथा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. ती शिकवते की प्रत्येक संकट ही संधी असते, फक्त त्याकडे योग्य दृष्टीकोनातून पाहण्याची गरज असते.
आणखी वाचा























