कांद्याची कृपा! कांद्याच्या पैशातून उभारली बिल्डिंग अन् त्यावर बांधली दीडशे किलोच्या कांद्याची प्रतिकृती
नाशिकमधील शेतकऱ्याने कांद्याच्या पैशातून एक टोलेजंग बिल्डिंग बांधली आणि त्यावर तब्बल दीडशे किलोची कांद्याची प्रतिकृती उभारली आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणजे कांदा. हाच कांदा कधी शेतकऱ्याला रडवतो तर कधी हसवतो. मात्र येवला तालुक्यातील एका शेतकऱ्याला कांद्याने चांगली साथ दिली. त्या कांद्याच्या पैशातून त्या शेतकऱ्याने घर बांधलं. मग या कांद्याप्रति आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याने चक्क घरावर कांद्याची प्रतिकृती साकारली.
कांदा सर्व सामान्य माणसाच्या खाण्याच्या पदार्थातील अविभाज्य घटक. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी भाव कमी मिळो किंवा जास्त, त्याची पर्वा न करता नगदी पिक म्हणून कांद्याची लागवड करतात. येवला तालुक्यातील धनकवाडी येथील शेतकरी सोमनाथ जाधव आणि अनिल जाधव यांची वडिलोपार्जित तीस एकर शेती आहे. 2019 आणि 2020 मध्ये त्यांनी चाळीत साठवलेल्या कांद्याला शेवटच्या टप्प्यात चांगला भाव मिळाला. त्यातून त्यांना लाखोंचा फायदा झाला. मग काय... या दोघा भावांनी शेतातील आवारातच एक टुमदार बंगला बांधण्याचा निर्णय घेतला.
बंगला बांधण्याचं काम अखेरच्या टप्प्यात आलेलं असतांना ज्या कांद्यामुळे पैसे मिळाले त्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी घराच्या टेरेसवर चक्क कांद्याची प्रतिकृती तयार केली. या कांद्याच्या प्रतिकृतीचं वजन तब्बल दीडशे किलोच्या जवळपास आहे. कांद्याची ही प्रतिकृती त्यांनी टेरेसच्या दर्शनी भागात लावून घेतली आहे.
या भागात पावसाचं प्रमाण तसं कमी असतं. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचं पावसाच्या पाण्यावर येणारे पीक म्हणजे कांदा. तसे जाधव कुटुंब सधन शेतकरी असून त्यांच्याकडे दूध-दुभती जनावरं असल्याने त्यांच्या दुधातून त्यांना चांगली कमाई होते. तरीही दोन वर्षात कांद्याने जेवढे पैसे कमवून दिले, त्याची जाण ठेवत त्यांनी लासलगाव येथून ही 150 किलो वजनाची कांद्याची प्रतिकृती तयार करुन घेतली. यासाठी त्यांना जवळपास 17 ते 18 हजार रुपयांचा खर्चा आला.
अनेक व्यक्तींकडे वेगवेगळ्या माध्यमातून पैसा हाती येतो आणि ते घर उभारतात. कोणी घरावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारतो तर कोणी शेअर्सच्या माध्यमातून पैसे मिळाले म्हणून घराला त्याचं नाव देतो. मात्र कांद्याच्या माध्यमातून मिळालेल्या पैशातून घर उभारत त्या कांद्याप्रति आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी चक्क घरावर कांद्याची प्रतिकृती उभारतो असं नाशिक जिल्ह्यातील हे पहिलेच उदाहरण पहावयास मिळतंय. त्यामुळे जाधव बंधूंनी आपल्या घरावर उभारलेली कांद्याची प्रतिकृती सध्या पंचक्रोशीत चांगलीच चर्चेचा विषय बनलीय.
महत्त्वाच्या बातम्या :