Monsoon News : रत्नागिरीसह बदलापुरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
महाराष्ट्रात रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या चांगल्याच सरी बसरल्या. तसेच बदलापूरमध्ये देखील सकाळच्या सुमारास अचानक पावसानं हजेरी लावली.
Monsoon News : सध्या देशात मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळत आहेत. पुढच्या एक ते दोन दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर देशात आणि महाराष्ट्रातील काही मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या चांगल्याच सरी बसरल्या. रत्नागिरी शहरात कोसळलेल्या अचानक जोरदार पावसामुळं नागरिकांची तारांबळ उडाली. तर दुसरीकडे बदलापूरमध्ये देखील सकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, कालपासूनच कोकणात ढगाळ वातावरण होते. अशातच रत्नागिरमध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्यानं काही ठिकाणी गारवा तर काही भागात थंड वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बदलापूर शहरात सकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं गेल्या काही महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आठवडाभरापासून शहरात उन्हाचा कडाका काहीसा कमी होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळं पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार आज सकाळी अचानक पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं हवेत काहीसा गारवा निर्माण झाल्याने सगळेच सुखावले आहेत.
केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील एक ते दोन दिवसांमध्ये मान्सून (Monsoon ) केरळमध्ये दाखल होणार आहे. मान्सून श्रीलंकेत दाखल झाला असून केरळमध्ये काल मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. केरळमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. केरळमध्ये 50 टक्क्यांहून अधिक स्टेशन्सवर पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 1 जूनच्या आधी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. जूनच्या सुरुवातीला मान्सूनची वाटचाल धीम्या गतीने राहणार आहे. परंतु, जून-जुलै महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. वेळेच्या सहा दिवस आधीच मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. विदर्भात देखील उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला आहे. परंतु, विदर्भात देखील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महत्वाच्या बातम्या: