(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News: औरंगाबादच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली! हरभऱ्यावर मर रोगाचा तर कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव
Agriculture News: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत वातावरणात बदल होत असल्याने त्याचा फटका रब्बीच्या पीकांना (Rabi Season) बसत आहे.
Agriculture News: आधीच अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर (Farmers) आता आणखी एक नवीन संकट उभे राहिले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) काही भागात हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. तर कापसावर (Cotton) देखील लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बदलत्या वातावरणामुळे औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव, वेरूळ, पळसवाडी, कसाबखेडा, चिंचोली, पिंपरी, आखतवाड़ा परिसरात हरभऱ्यावर मर, तर कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, पीक वाचविण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत वातावरणात बदल होत आहे. कधी थंडी, तर कधी कडक ऊन, तर कधी थंडगार वाऱ्यासह धुके पाहायला मिळत आहे. या बदलत्या वातावरणाचा फटका रब्बीच्या पिकांना बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात वाढलेल्या धुक्यामुळे कपाशीसह तूर, हरभऱ्याचे पीक धोक्यात आले आहे. कपाशीवर लाल्या, करपा रोगाने हल्ला केला असून, हरभऱ्यावर मर रोग आला आहे. तसेच तुरीचा फुलोरा, शेंगा गळती होत असल्याने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती वाढली आहे. तुरीचे पीक अचानक सुकत आहे.
कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव
मागील दोन-तीन वर्षांमध्ये कपाशीवर बोंडअळी, बोंडसडचा प्रकोपाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. मात्र यंदा बोंडअळी कमी प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. पण आता लाल्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे.
हरभऱ्यावर मरचा प्रादुर्भाव
वातावरणातील बदलाचा फटका हरभऱ्याला देखील बसत आहे. हरभऱ्यावर मरच्या प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. त्यामुळे रब्बी हंगामामध्ये हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पिके धोक्यात आली आहेत. रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करीत असल्याने याचा आर्थिक फटकाही त्यांना बसत आहे.
बळीराजा पुन्हा संकटात...
यंदाच्या हंगामात सुरवातीला औरंगाबाद जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. परंतु त्यातून सावरत उरल्यासुरल्या पिकांना शेतकऱ्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढे परतीच्या पावसाने उरल्यासुरल्या पीकही मातीमोल झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप पूर्णपणे गेले होते. आता रब्बीची पेरणी करून त्यातून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असतानाच बदलत्या वातावरणामुळे पीकांवर वेगवेगळ्या रोगांचे प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटात सापडला आहे. .
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Agriculture News : हवामानातील बदलाचा शेती पिकांना फटका, उत्पादनात घट होणार; शेतकरी चिंतेत