(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून किती शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार येणार? राज्य सरकारकडून आकडेवारी जारी
Namo Shetkari Maha Sanman : महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये पाठवले जातात.
मुंबई : केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरु करण्यात आली होती. त्या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर एका वर्षात 6 हजार रुपये पाठवले जातात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना राबवली जाते. आज वाशिम येथे झालेल्या कार्यक्रमात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याची रक्कम राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. याशिवाय पीएम किसान सन्मान योजनेच्या 2 हजार रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आली. म्हणजेच आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार रुपये जमा होणार आहेत.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार?
महाराष्ट्र सरकारनं "नमो शेतकरी महासन्मान निधी" ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना सुरु केली आहे. योजनेतून महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये पाठवले जातात. महाराष्ट्र सरकारनं नमो शेतकरी महासन्मान योजनेतून 91.45 लाख शेतकरी कुटुंबांना आत्तापर्यंत रु. 6949.68 लाभ वितरित करण्यात आला आहे. आजा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याचे 2 हजार आणि राज्य सरकारच्या योजनेचे 2 हजार असे एकूण 4 हजार राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यातील एकूण सर्व शेतकऱ्यांना मिळूण 4 हजार कोटी रुपये मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या आधार संलग्न असलेल्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर विविध योजना नव्यानं सुरु करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली. महराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी ही योजना सुरु करण्यात आली होती.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हजार रुपये
केंद्र सरकारप्रमाणं महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना सुरु केलेली आहे. त्यामुळं पीएम किसान सन्मान योजनेचे 6 हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 6 हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत.
दरम्यान, पीएम किसान सन्मान योजनेतून आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 34 हजार रुपये पाठवण्यात आले आहेत. तर, नमो शेतकरी महासन्मान निधीचे यापूर्वीपर्यंत चार हप्त्यांचे 8 हजार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाले होते. आज दोन्ही योजनांचे एकूण चार हजार रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
इतर बातम्या :