Kisan sabha : शेतकरी प्रश्नांसाठी किसान सभा पुन्हा मैदानात, मंत्री विखेंच्या कार्यालयावर धडकणार 'लाल वादळ'
Kisan sabha : शेतकरी प्रश्नांवरुन पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्यापासून किसान सभेच्या वतीनं अकोले ते लोणी अशा पायी मोर्चाला सुरुवात होणार आहे.
Kisan sabha : शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नांवरुन पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. नैसर्गिक आपत्ती आणि राज्यात सुरु असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मुलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राजकीय अस्थिरतेमुळं सामान्य जनतेचे विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला फेकले गेलेत. जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणे अनिवार्य झालं आहे. त्यामुळं किसान सभेच्या पुढाकारानं उद्यापासून (26 एप्रिल) ते 28 एप्रिल 2023 या काळात शेतकरी अकोले ते लोणी असा जबरदस्त राज्यव्यापी पायी मोर्चा काढणार आहेत.
मंत्री विखेंच्या कार्यालयावर धडकणार मोर्चा
अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना तसेच शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय या समविचारी संघटनांचा या मोर्चात सहभाग असणार आहे. हा मोर्चा तीन दिवस पायी चालून, महसूल आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रुपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करुन लढा तीव्र केला जाणार असल्याचा इशारा देखील किसान सभेनं दिला आहे.
किसान सभेच्या नेमक्या मागण्या काय?
राज्यात मागील दोन हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांच मोठं नुकसान झालं आहे. सरकारनं या पिकांना नुकसानभरपाई देण्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र कोठेही मदत करण्यात आली नाही. वन जमिनी, देवस्थान, इनाम, वक्फ, वरकस, आकारीपड, गायरान आणि घरांच्या तळ जमिनी, नावे करण्याची वारंवार आश्वासने दिली गेली. प्रत्यक्षात मात्र जमीन नावे करण्याऐवजी पोलीस आणि वन विभागाचा दुरुपयोग करत गरीब श्रमिकांना अमानुषपणे मारहाण करून घरे आणि जमिनींवरुन हुसकावून काढण्याच्या मोहिमा सुरु करण्यात आल्या आहेत. जबरदस्तीने आणि अत्यल्प मोबदला देत शेतकऱ्यांच्या जमिनी, रस्ते, कॉरीडोर, विमानतळ आणि तथाकथित विकासकामांसाठी हडप केल्या जात आहेत.
दुग्धपदार्थ आयात करण्याच्या हालचाली सुरु
कोरोना संकटात 17 रुपये लिटरप्रमाणे दूध विकावे लागल्यानं हतबल झालेले दूध उत्पादक आता व्यवसायात पुन्हा उभे राहू लागले आहेत. अशातच पुन्हा एकदा केंद्र सरकारने दुग्धपदार्थ आयात करण्याच्या हालचाली सुरु करुन दुग्ध उत्पादकांचे जीणे हैराण केले आहे. राज्यातील अंगणवाडी कर्मचारी, आशा, सुपरवायझर, आहार कर्मचारी, बांधकाम कामगार, अर्धवेळ परिचर, घरेलू कामगार त्यांचे प्रश्न तीव्र झाल्याने हैराण झाले आहेत.
पिकांना रास्त भावाची हमी द्यावी
दूध, कापूस, सोयाबीन, हिरडा, तूर, हरभरा यासारख्या पिकांना रास्त भावाची हमी देण्यात यावी अशी मागणीही करण्यात येणार आहे. दुग्धपदार्थ आयात करुन दुधाचे भाव पाडण्यास विरोध आहे. जमीन अधिग्रहणास योग्य मोबदला मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना आणि निराधारांना पेंशन, सर्वांना घरकुले, कर्ज आणि वीजबिल माफी, शेतीला सिंचनासाठी धरणांचे पाणी, बांधकाम कामगारांना मेडिक्लेम द्यावा अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर घरकुल तसेच आशा कर्मचारी, आशा सुपरवायझर, अंगणवाडी ताई, पोषण आहार कर्मचारी, अर्धवेळ स्री परिचर, घरेलू कामगार यांचे प्रश्न घेऊन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर हा भव्य राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात येत आहे.
अकोले ते लोणी पायी मोर्चाचा कसा असेल मार्ग?
दिनांक 26 एप्रिल 2023
अकोले बाजार तळ ते रामेश्वर मंदिर परिसर, धांदरफळ, ता. संगमनेर : 12 किलोमीटर
दिनांक 27 एप्रिल सकाळी
रामेश्वर मंदिर परिसर, धांदरफळ ते खतोडे लॉन्स : 10 किलोमीटर
दिनांक 27 एप्रिल दुपारी
खतोडे लॉन्स ते जनता विद्यालय, वडगाव पान : 9.6 किलोमीटर
दिनांक 28 एप्रिल सकाळी
वडगाव पान ते समृद्धी लॉन्स, निमगाव जाळी : 11 किलोमीटर
दिनांक 28 एप्रिल दुपारी
समृद्धी लॉन्स, निमगाव जाळी ते लोणी : 10 किलोमीटर
महत्त्वाच्या बातम्या: