लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार मोठी भेट? करणार 'हे' काम
2024 च्या लोकसभा निवडणुकपूर्वी भाजप शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे.
Loksabha Election: 2024 मध्ये देशात लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) होत आहे. या पार्श्वभूमीवर आत्तापासून राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकपूर्वी भाजप शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता आणि 17 वा हप्ता देखील एकाच वेळी शेतकऱ्यांना देण्याची शक्यता आहे. तसेच या हफ्त्यांची रक्कम देखील वाढवण्याची शक्यता आहे.
आत्तापर्यंत PM किसान योजनेचे शेतकऱ्यांना मिळाले 15 हफ्ते
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (15 नोव्हेंबर 2023) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात दमा केला. झारखंडमधील जाहीर कार्यक्रमात हा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान 16 वा हप्ता जाहीर करण्याची वेळ येईल तेव्हा मोदी सरकार शेतकऱ्यांना आणखी मोठी भेट देऊ शकते.
निधीत किती वाढ करणार?
मार्च 2024 च्या पहिल्या पंधरवड्यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी, मोदी सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 16 व्या आणि 17 व्या हप्त्याची रक्कम एकाच वेळी वाढवून जारी करु शकते. जेणेकरून निवडणुकीत शेतकऱ्यांची व्होट बँक मजबूत करता येईल. पाच वर्षांपूर्वी, 1 फेब्रुवारी 2019 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना तत्कालीन अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्याची घोषणा केली होती. तेव्हा विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील तेव्हा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत तीन हप्त्यांमध्ये वार्षिक दिले जाणारे 6000 रुपये 8,000 ते 9,000 रुपये केले जाऊ शकतात.
शेतकऱ्यांना एकसाथ मिळू शकतो 16 वा आणि 17 वा हप्ता
अंतरिम बजेटमध्ये रक्कम वाढवण्याच्या घोषणेनंतर, निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मोदी सरकार 16 वा हप्ता आणि 17 वा हप्ता एकाच वेळी जारी करु शकते. 24 फेब्रुवारी 2019 रोजी, 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या अगदी आधी, PM मोदींनी PM किसान योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता एकत्र हस्तांतरित केला होता. त्यावेळी 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा झाला. 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये केंद्रात मोदी सरकार मोठ्या बहुमताने स्थापन झाले. त्याच सूत्राची पुनरावृत्ती 2024 च्या निवडणुकीत होऊ शकते.
तीन कृषी कायद्यांनंतर शेतकरी संतप्त
सरकारनं 2020 मध्ये तीन कृषी कायदे आणल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये मोदी सरकारविरोधात संताप दिसून आला. हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी वर्षभर दिल्ली सीमेवर बसले होते. अखेर सरकारला शेतकऱ्यांच्या आडमुठेपणापुढं झुकावं लागलं. खुद्द पीएम मोदींनी हे तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.
11 कोटी शेतकऱ्यांना मिळाले 2.80 लाख कोटी रुपये
बुधवारी 15 नोव्हेंबर 2023 रोजी पीएम किसान योजनेअंतर्गत 8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18,000 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 2.80 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. PM किसान सन्मान योजनेने जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना आहे.
महत्त्वाच्या बातम्या: