थांबा, पेरणीसाठी घाई करु नका, पुरेसा पाऊस झाला नाहीतर...; कृषीमंत्री दादा भुसेंचं शेतकऱ्यांना आवाहन
Maharashtra Agriculture News : यंदा मान्सून उशीरा येत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, किमान 80 ते 100 मिमी पाऊस पडल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी करु नये, कृषीमंत्री दादा भुसेंचं शेतकऱ्यांना आवाहन
Maharashtra Agriculture News : जूनचा पहिला आठवडा सरला तरी राज्यात मान्सूनच्या सरी बरसलेल्या नाहीत. त्यामुळे पेरणीची कामं करावी की, नाही? अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी आहेत. मात्र मान्सून उशीरानं येत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
हवामान खात्याच्या वतीनं यंदाच्या वर्षी मान्सून (Monsoon) लवकर धडक देणार, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. पण अद्याप राज्यात मान्सूनचा पत्ता नाही. कर्नाटकात दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळलेला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात येत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अशातच कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
यंदा मान्सून उशीरा येत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, किमान 80 ते 100 मिमी पाऊस पडल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी करु नये, असं दादा भुसेंनी सांगितलं आहे. पाऊस पुरेसा झाला नाही, तर दुबार पेरणीची वेळ येईल, त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांनी काही काळ पावसाची वाट पाहावी, असं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केलं करण्यात आलं आहे.
मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला
अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यानं अगदी हैराण केलं आहे. अशातच सर्वचजण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण, राज्यात मात्र अद्यापही उष्णतेची लाट (Heat Wave) जाणवत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे. यंदा मान्सून लवकर दर्शन देणार, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. पण मान्सून मात्र अद्याप महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळला आहे. काही दिवसांपासून मान्यून कर्नाटकातील कारवारमध्ये अडकला होता. आता तो मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगमनासाठी आता नवा मुहुर्त देण्यात आला आहे.
कर्नाटकात दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळलेला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा चांगलाच वाढला आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. काही भागांत पुढील दोन-तीन दिवसांत मान्सूनपूर्व सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.