तीन एकरातील मुरमाड शेत जमिनीतही तब्बल 360 टन उसाचे विक्रमी उत्पादन; कोल्हापूरच्या आधुनिक शेतकऱ्यांची अनोखी किमया
Farmer Sucess Story : कोल्हापूरच्या शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने उसाची शेती केलीय आणि प्रतिगुंठा विक्रमी उत्पादन घेतले आहे. कोल्हापूरच्या या शेतकर्याची सध्या राज्यात चर्चा होत आहे.
Farmer Sucess Story कोल्हापूर : बदलत्या हवामानामुळे एकीकडे राज्यात शेतीचे नुकसान होत आहे. मात्र कोल्हापूरच्या शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने उसाची शेती केलीय आणि प्रतिगुंठा विक्रमी उत्पादन घेतले आहे. कोल्हापूरच्या या शेतकर्याची सध्या राज्यात चर्चा होत असून त्यांच्या शेतातील लांबलचक ऊस पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी होत आहे.
तब्बल 50 ते 55 पेरी असणारा लांबलचक वजनदार ऊस सोळा महिन्यात तयार
योग्य नियोजन अन् वेळच्या वेळी मशागत केली तर मुरमाड शेत जमिनीतही उसाचे विक्रमी उत्पादन घेता येते. हे कोल्हापुरातील लाटवडे गावच्या उद्योजक शंकर पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे. शंकर पाटील यांचे हातकणंगले तालुक्यातील लाटवडे हे गाव आहे. पाटील कोल्हापुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असूनही त्यांना पहिल्यापासूनच शेतीची आवड आहे. त्यामुळेच आजवर त्यांनी द्राक्ष, केळी, पपई अशी प्रयोगशील शेती केली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी आधुनिक पद्धतीने ऊस शेती केली. विक्रमी उत्पादन घेण्याचा निर्धार करून त्यांनी उसाची लागण केली. जुलैमध्ये 86032 या जातीची बीज प्रक्रिया करून दोन डोळ्यांच्या कांडीची साडेचार फूट सरी सोडून लावण त्यांनी केली. अन् तब्बल 50 ते 55 पेरी असणारा लांबलचक वजनदार ऊस सोळा महिन्यात तयार झाला. अशी माहिती उद्योजक शंकर पाटील यांनी दिली
नियोजनाचा सुरेख मेळ, यशाचा मंत्र
पाटील यांना गुंठ्याला तीन टन उत्पादन घेण्यात यश आले आहे. जाड पेरी असलेला लांबलचक वजनदार ऊस तीन ते चार ठिकाणी तोडूनच त्याची मोळी बांधावी लागतेय. एकसारखा तीन एकरातील हा ऊस तब्बल 360 टन उत्पादन देणारा ठरणार आहे. एकरी 42 हजार ऊस राहावेत, यासाठी अतिरिक्त ऊस काढून उसाची संख्या मोजून घेतली. योग्य पद्धतीने मशागत, खतांची मात्रा वेळच्या वेळी देणे, पाण्याचे योग्य नियोजन याचा सुरेख मेळ घातल्याने पाटील यांना एकरी 120 टन उत्पादनाची हमी मिळाली असल्याचे ऊस शेतीतज्ज्ञ सचिन पाटील म्हणाले.
पाटील यांच्या तीन एकर शेतात हा 50 ते 55 पेरांचा लांबलचक ऊस वाढला आहे. उसाची शेती परवडत नाही अशी तक्रार त्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन फोल ठरविली आहे. शेतीचे योग्य त्या पद्धतीने व्यवस्थापन केले की भरघोस उत्पादन मिळते अन् आर्थिक फायद्याचा गोडवा ही चाखता येतो हे शंकर पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या