Dhule Rain : धुळे जिल्ह्यात पावसाची संततधार, शेतकऱ्यांना दिलासा, दुबार पेरणीचं संकट टळलं
धुळे शहरासह जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Dhule Rain : सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस बरसत आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच धुळे शहरासह जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 12 तासात जिल्ह्यात 28 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर चांगला पाऊस झाल्यानं शेतीकामांना वेग आला आहे. काही ठिकाणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे, त्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
साक्री तालुक्यात 40 मिलिमीटर पावसाची नोंद
धुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा होती. एकीकडं राज्यात मुसळधार पाऊस सुरु असताना दुसरीकडं मात्र धुळे जिल्ह्यात समाधानकारक पावसाची हजेरी लागत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, गेल्या 12 तासापासून शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या सुरु असलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाने आणि डेडर गाव या तलावांमध्ये जलसाठा वाढणार आहे. त्यामुळं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच शहराच्या विविध भागात देखील पाणी साचलं असून नागरिकांना पाण्यामधून वाट काढत मार्गक्रमण करावं लागत आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात 40 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर शिंदखेडा तालुक्यात देखील पावसानं दमदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील खड्ड्यांमध्ये साचले पाणी
धुळे शहरात पावसाची संततधार सुरु असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडं मात्र कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पावसासोबत रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याचा देखील सामना करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे होणं अपेक्षित असताना देखील महापालिकेकडून ही कामं पूर्ण न झाल्यानं शहराच्या विविध भागातील रस्त्यांची कामे अजूनही अपूर्ण आहेत. यामुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाचा पिकांना होणार फायदा
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर काल आषाढी एकादशीपासून सुरु झालेला पाऊस अजूनही काय आहे. यामुळं पेरणी करुन ठेवलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाची वेळेवर हजेरी लागली नाही तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहणार होते. मात्र अखेर वरुणराजानं शेतकऱ्यांवर कृपा केल्यानं हे संकट टळलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, अनेक गावांचा संपर्क तुटला, हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली
- Hingoli: हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, पुराची भीषणता दाखवणारी दृश्य