(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hingoli Rain : हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीच्या पुरात मोठं नुकसान, 90 टक्के शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
हिंगोली जिल्ह्यात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यानं नदीच्या काठावर असलेल्या गावांचं मोठं नुकसान झालं आहे.
Hingoli Rain : हिंगोली जिल्ह्यातील मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यानं नदीच्या काठावर असलेल्या कुरुंदा, किन्होळा, आसेगावं आणि टाकळगाव या गावांना या पुराचा फटका बसला आहे. या गावातील 90 टक्के शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तर या गावातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी देखील शिरलं आहे. दरम्यान, हळूहळू गावांमधील पाणी आता ओसरत आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
हिंगोली जिल्ह्यातील पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचं या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. 90 टक्के शेतीचं नुकसान झालं असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. तसेच नदी काठच्या गावात पुराचं पाणी शिरल्यानं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी घरांची मोठी पडझड झाली आहे. तसेच संसार उपयोगी सर्व साहित्य पाण्यात भिजले आहे.
हिंमगोली जिल्ह्यातील कुरुंदा गावात काल झालेल्या जोरदार पावसानं आसना नदीला पूर आला. या नदीचे पाणी थेट गावात शिरलं. बघता बघता प्रत्येकाच्या घरात तीन फूट पाणी साचले. पाण्याचा ओघ जास्त असल्यानं अनेकांची घरे पडली आहेत. या पावसात घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य भिजले आहे. घरातील गहू, तांदूळ, डाळी पाण्यात भिजल्यानं खराब झाल्या आहेत.
घरात पाणी शिरल्यानं घरातील चिखल काढून घर दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. घरातील साहित्याबरोबर घरातील सर्व कागदपत्र आणि विद्यार्थ्यांचे वह्या पुस्तके भिजली आहेत. घरातील अंथरुण, पांघरुण, कपडे भिजल्यानं राहावं कुठे आणि खावे काय हा प्रश्न नागरिकांच्या समोर निर्माण झाला आहे.
कुरुंदा, किन्होळा, आसेगाव आणि टाकळगाव या गावातील 90 टक्के शेती पाण्यामुळं खरवडून गेली आहे. हळद, सोयाबीन, ऊस, केळी या पिकांचे नुकसान झाले आहे. तर शेतावरील सुपीक मातीचा गाळ वाहून गेल्यानं कधीही भरुन न निघणारं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, अनेक गावांचा संपर्क तुटला, हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली
- Hingoli: हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, पुराची भीषणता दाखवणारी दृश्य