Nandurbar News : अवकाळीमुळं व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मिरचीला मोठा फटका, नुकसान भरपाई देण्याची मागणी
Nandurbar News : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातही अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे.
Nandurbar News : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातही अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना (Agriculture Crop) बसत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली ओली लाल मिरची वाळवण्यासाठी पथरींवर टाकली जात असते. मात्र, गेल्या चार दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामध्ये 15 हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरची खराब होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मिरचीसाठी विमा संरक्षण देण्याची मागणी
दरम्यान, व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करुन भरपाई त्यांना द्यावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा मिरची व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली ओली लाल मिरची पथारींवर वाढण्यासाठी टाकत असतात. मात्र, गेल्या चार दिवसांपासून असलेल्या अवकाळी पावसामुळं मिरची ओली होऊन काळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात मिरची खराबही होत असते. त्यामुळं सरकारनं मिरची व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पथारीवर टाकलेल्या मिरचीसाठी विमा संरक्षण देण्याची मागणी नंदुरबार जिल्हा मिरची व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवी कोठारी यांनी केली आहे.
ज्वारी, गहू, हरभरा यासह फळबागांना मोठा फटका
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत. या पावसामुळं ज्वारी, गहू, हरभरा, टरबूज, खरबूज यासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच केळी, द्राक्ष आंब्याच्या बागांनाही या पावसाचा आणि गारपीटीचा मोठा फटका बसला आहे
अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश : कृषीमंत्री
राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लवकरच निर्णय घेतील असेही कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: