(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : भंडाऱ्यातील मिरची उत्पादक अडचणीत, रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं क्वालिटी घसरली, खरेदीकडं व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ
भंडारा जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. मिरचीवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं क्वालिटी घसरली आहे. त्यामुळं व्यापाऱ्यांनी मिरची खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
Agriculture News in Bhandara : भंडारा (Bhandara) जिल्हा तांदूळ (Rice) उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. मात्र, मागील काही वर्षात तांदळाची शेती करणं जिकरीचे झाल्यानं शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून मिरचीची (Chili) लागवड करायला सुरुवात केली आहे. मात्र, यावर्षी मिरचीवर चुरडा, मुरडा आणि बोकड्या नावाच्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं मिरचीची क्वालिटी घसरली असून तिचा दरही कमी झाला आहे. त्यामुळं अशा मिरचीच्या खरेदीकडे व्यापाऱ्यांनीही पाठ फिरवली आहे. त्यामुळं मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
मिरचीला किलोला 14 ते 18 रुपयांचा दर, शेतकरी चिंतेत
तुमसर, मोहाडी यासह अन्य तालुक्यातही मिरचीचे उत्पादन घेतले जाते. यापूर्वी भंडारा जिल्ह्यातील मिरची दिल्ली आणि बंगळुरु याठिकाणी व्यापाऱ्यांनी विकली होती. त्यावेळी जवळपास 70 रुपयांचा दर किलोला मिळाला होता. मात्र, यावर्षी वातावरण बदलामुळं मिरचीवर चुरडा, मुरडा आणि बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. या रोगामुळं मिरचीची उत्पादन क्षमता कमी झाल्यानं मिरचीची वाढ खुंटली आहे. मिरचीचे उत्पादन कमी सोबतच क्वालिटीही नसल्यानं व्यापाऱ्यांनी मिरची खरेदीकडे पाठ फिरवली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मिरची नाईलाजानं 14 ते 18 रुपये किलो दरानं विकावी लागत आहे. यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
पिकाची वाढ झालेली नाही. त्यामुळं मिरची लागवडीसाठी लागलेला खर्चही निघणार नाही. उत्पादन कमी झाले सोबतच मिरचीची क्वालिटी नसल्यानं त्याला दरही मिळाला नाही. त्यामुळं भंडारा जिल्ह्यातील मिरचीच्या मागणीचा समतोल राखण्यासाठी नागपूर, अमरावती जिल्ह्यातून मिरचीची आवक वाढली आहे. परिणामी, दिल्ली आणि बंगळुरुला जाणाऱ्या मिरचीची खेप यावर्षी जाणार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
भंडारा जिल्ह्याती मिरचीची काय स्थिती
भंडारा जिल्ह्यात 900 हेक्टरवर मिरचीची लागवड करण्यात आली आहे.
एकूण उत्पादन 63 हजार किलो
एका एकरात 30 क्विंटल उत्पादन
चुरडा, मुरडा, बोकडया रोगाचा मिरचीच्या पिकावर प्रादुर्भाव झाला आहे
नागपूर, अमरावती जिल्ह्यातून मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे
मिरचीची योग्य क्वालिटी नसल्याने व्यापाऱ्यांनी मिरची खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे
नंदूरबारमध्ये मिरचीची आवक घटली
नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समिती (Nandurbar Agricultural Produce Market Committee) ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ आहे. सध्या या बाजार समितीमध्ये मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. मिरचीवर झालेल्या रोगांच्या प्रादुर्भाव आणि अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळं बाजारात मिरचीची आवक कमी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मिरचीची आवक 50 टक्क्यांनी घटली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Agriculture News : देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या बाजार समितीत मिरचीची आवक घटली, उत्पादनात घट होण्याची कारणं काय?