(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या बाजार समितीत मिरचीची आवक घटली, उत्पादनात घट होण्याची कारणं काय?
Agriculture News : देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती असलेल्या नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीची आवक घटली आहे.
Agriculture News : नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समिती (Nandurbar Agricultural Produce Market Committee) ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची (Chili) बाजारपेठ आहे. सध्या या बाजार समितीमध्ये मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. मिरचीवर झालेल्या रोगांच्या प्रादुर्भाव आणि अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळं बाजारात मिरचीची आवक कमी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मिरचीची आवक 50 टक्क्यांनी घटली आहे.
विविध रोगांचा मिरचीवर प्रादुर्भाव
ऑक्टोबर महिन्यापासून मिरचीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 50 हजार क्विंटल मिरचीची विक्री झाली आहे. मिरचीवर अनेक प्रकारचे रोग आल्यामुळं मिरची पिकात मोठ्या प्रमाणावर घट आल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम मिरची विक्रीवर होताना दिसत आहे. मिरचीचा हंगाम जानेवारी महिन्यापर्यंत सुरू राहण्याचा अंदाज बाजार समितीकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. मात्र, एकीकडं मिरची उत्पादनात घट येत आहे. तर दुसरीकडे तेजीत असलेल्या मिरची बाजारात दरांमध्ये घसरण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे.
लाल मिरचीच्या दरात घसरण, शेतकऱ्यांची नाराजी
नंदूरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीला तीन हजार रुपयापासून पासून ते सहा हजार 500 रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे. तर सुक्या लाल मिरचीला आठ हजार ते 16 हजार रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे. दररोज शंभर ते सव्वाशे वाहनातून 1 हजार 500 ते 2 हजार क्विंटल मिरचीची विक्री होत आहे. नंदूरबार बाजार समिती नंदूरबार जिल्ह्यासोबतच शेजारील असलेल्या धुळे आणि गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात देखील मिरची विक्रीसाठी दाखल होत आहे. मात्र, मिरचीला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातही मिरचीच्या दरात मोठी घसरण
भंडारा जिल्ह्यातही मिरचीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मिरचीचे दर अचानक घसरल्यानं भंडारा जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी मिरचीवर चुरडा, मुरडा, बोकड्या या रोगांचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळं मिरचीच्या रोपांची आणि पिकाची चांगली वाढ झाली नाही. परिणामी पिकांचा दर्जा घसरल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळालं. साहजिकच परराज्यात जाणाऱ्या मिरचीच्या मागणीत देखील मोठी घट झाली आहे. त्यामुळं गेल्या वर्षी 65 ते 70 रुपये दर मिळाला असताना यंदा मात्र हा दर अवघा 14 ते 20 रुपयांपर्यंत खाली आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: