Beed: पपईच्या बागावर व्हायरसचा हल्ला, शेकडो एकर पपईच्या बागा उद्ध्वस्त
पारंपरिक शेतीला फाटा देऊन फळबागांचं क्षेत्र वाढत असलं तरी फळबांगांवर पडणाऱ्या रोगामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय.
बीड: थंडीच्या काळात अधिक फळे खाण्यावर सगळ्यांचा भर असतो. त्यात पपईचीसुद्धा मागणी वाढताना दिसतेय. मात्र मागच्या आठवडाभरापासून पपईवरती व्हायरसने इतका अटॅक केलाय की बागाच्या बागा उद्ध्वस्त होऊ लागल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या बहुतेक गावातील पापईच्या बागावरती या व्हायरसचा अटॅक झाला आणि त्यामुळे काढणीला आलेले पीक हातचे जाताना शेतकऱ्यांना पहावं लागत आहे.
बीड जिल्ह्यातल्या आर्वी गावच्या सुरेश काळे यांनी तीन लाख रुपये खर्च करून साडेतीन एकरावर पपईची लागवड केली. मात्र ऐन तोडणीच्या काळातच ही बाग आता तोडून टाकावी लागत आहे. कारण पपईवर बुरशीजन्य व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आणि जिथे वीस लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती, तिथे मात्र आता एक रुपयाचंही उत्पन्न त्यांना मिळणार नाही.
फळबागातून जास्तीचे उत्पन्न मिळते म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पपईच्या बागा लावल्या. मात्र परतीच्या पावसानं पपईवर मर रोग आणि जास्तीच्या पाण्याने झाडांची खोड सडल्याने, पपईवर मावा तुडतुडे यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यातूनच या बुरशीसारख्या व्हायरसची निर्मिती झाली आणि हाच व्हायरस आता पपईच्या बागा अशा उद्ध्वस्त करत आहे.
शिरूर तालुक्यामध्ये सध्या या बुरशीजन्य व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून रामेश्वर भोसले यांच्या तीन एकरावरील पपईच्या बागेत आता फळ गळायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे पपईच्या फळावर सुरुवातीला डाग पडतात आणि नंतर फळ सडून जातं. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या या बागा स्वतः नष्ट कराव्या लागत आहेत.
पावसाळ्यामध्ये ज्या बागा तोडणीला आल्या आहेत, त्या भागांवर या व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. अनेक शेतकऱ्यांनी यावर उपाययोजना केल्या मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. परतीच्या पावसानं डाळिंब आणि मोसंबीच्या बागांना मोठा फटका बसला होता. आता पुन्हा पपईच्या बागांवर रोग पडल्याने शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहेत.
पारंपरिक शेतीला फाटा देऊन फळबागांचं क्षेत्र वाढत असलं तरी फळबाग लागवडीपासून ते काढणीपर्यंत योग्य व्यवस्थापन न झाल्यास देखील बागांचं नुकसान होण्याची शक्यता असते. त्यातच आता सतत बदलणारं वातावरण, नवीन येणारे रोग आणि व्हायरस यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे.
पारंपरिक पिके घेणाऱ्या सोयाबीन आणि कपाशीच्या शेतकऱ्याला परतीच्या पावसानं झोडपलं आणि चांगला पाऊस होऊ नये शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागलं. आता फळबागवाले शेतकरीसुद्धा अचानक आलेल्या या व्हायरसमुळे आर्थिक कोंडीत सापडलेत. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाचा संघर्ष काही केल्या संपत नाही हे मात्र खरं.