Soyaben News : सोयाबीनच्या दरात घसरण, राजकीय अजेंडा बाजुला ठेऊन शेतकऱ्यांनी चळवळ उभारावी, कृषी अभ्यासक श्रीकांत कुवळेकरांचं आवाहन
वायदे बंदीचा मोठा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळं वायदे बाजार परत सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांना चळवळ उभा करावी लागेल असे मत अभ्यासक श्रीकांत कुवळेकर यांनी व्यक्त केलं आहे.

Soyaben News : सध्या राज्यातील सोयाबीन (soybean) उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण सोयाबीनला कमी दर मिळत आहे. बाजारपेठेत सध्या सोयाबीनला 4 हजार 500 रुपयांचा दर मिळत आहे. याबाबत कृषी व्यापार आणि कमोडिटी मार्केटचे अभ्यासक श्रीकांत कुवळेकर (Shrikant Kuwalekar) यांनी त्यांचे मन नोंदवलं आहे. वायदे बंदीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळं वायदे बाजार परत सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांना चळवळ उभा करावी लागेल असे मत श्रीकांत कुवळेकर यांनी व्यक्त केलं आहे.
जून महिन्यात पेरलेले खरिपाचे सोयाबीन तेव्हा 7 हजार ते 7 हजार 200 रुपये बाजार भाव चालू असताना, वायदे बाजारात निदान 6 हजार 700 ते 6 हजार 800 रुपयात आगाऊ विकून जोखीम व्यवस्थापन करणे सहज शक्य होते. परंतू, वायदे बाजार बंद केल्यानं ही संधी हिरावून घेतली गेली. आज सोयाबीनला 4 हजार 500 रुपयांचा दर मिळत आहे. चक्क 2 हजार ते 2 हजार 200 रुपये प्रति क्विंटलचा तोटा होत असल्याचे कुवळेकर यांनी म्हटलं आहे.
चण्याची विक्रीही हमीभावाच्या खाली
मागील हंगामात 10 हजार रुपयांना देखील न मिळणारे सोयाबीन आज निम्म्याहून कमी किंमतीत विकलं जात आहे. ते सुद्धा संपूर्ण जगात महागाई असताना. तीच अवस्था चण्याची आहे. चणा तर हमीभावाखाली विकला जात आहे. तर महाराष्ट्रामध्ये हंगाम सुरु होईल तेव्हा सोयाबीन देखील हमीभावाच्या म्हणजे 4 हजार रुपयांखाली घसरण्याची शक्यता निर्माण झाल्याचे कुवळेकर यांनी म्हटलं आहे. लक्षात घ्या वायद्यात शेतकऱ्यांचा फायदा आहे. केंद्र आणि राज्य सरकार वायदे बाजाराचा उपयोग शेतकऱ्यांसाठी करून घेण्याच्या दृष्टीने कार्यक्रम आखत आहे. त्यासाठी स्मार्ट सारख्या योजनांमध्ये देखील प्रशिक्षण देण्याचा इरादा आहे. फ्युचर्स आणि पुट ऑप्शन्स द्वारे क्रांती होणे दृष्टीपथात आलेले आहे. मात्र, काही हितसंबंधी व्यापारी वायदा बंद ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कुवळेकर यांनी म्हटलं आहे. हे मनसुबे हाणून पाडून वायदे बाजार परत सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांनी चळवळ उभा करावी असेही कुवळेकर यांनी म्हटलं आहे.
त्यामुळं या प्रश्नावर सर्वांनी आपले राजकीय अजेंडा आणि पक्षीय कार्यक्रम बाजूला ठेवून एकत्र येऊन मोठी चळवळ उभारणे गरजेचे असल्याचे कुवळेकर यांनी म्हटलं आहे. शेतीमित्र म्हणजे त्यात सर्व प्रकारची माध्यमे, शेतकरी संघटना, सामाजिक संस्था, FPO फेडरेशन्स आणि शेती विषयातील अभ्यासक हे सर्वच जण आपापल्या परीने सहभाग घेऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी आपापल्या परीनं आणि आपापल्या पातळीवर प्रयत्न सुरु करावेत असेही कुवळेकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Soybean Price : सोयाबीनच्या दरात घसरण, 4 हजार 500 रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत, काढणीचा दरही वाढला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
