Soybean Price : सोयाबीनच्या दरात घसरण, 4 हजार 500 रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत, काढणीचा दरही वाढला
सध्या बाजारात सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. सोयाबीनला 4 हजार 500 रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
Soybean Price : सोयाबीन (Soybean) हे शेतकऱ्यांचं हक्काचं नगदी पिक आहे. खरीपातील पिकांमध्ये शेतकऱ्यांना उडीद-मुगानंतर हमखास पैसे देणारं दुसरं नगदी पिक म्हणजे सोयाबीन. मात्र, आता सोयाबीन काढणीला प्रारंभ झाला असतानाच शेतकरी चिंतेत आहेत. कारण सध्या बाजारात सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. शुक्रवारी (30 सप्टेंबर) अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत (Akola Agricultural Produce Market Committee) सोयाबीनला 4 हजार 500 रुपयांचा दर मिळाला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळं सोयाबीनच्या लागवडीचा खर्च वाढला आहे. मात्र, हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीनचे भाव पडल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
पावसाचा सोयाबीनच्या पिकाला मोठा फटका
गेल्या वर्षीचा सोयाबीन हंगाम संपताना सोयाबीननं विक्रमी भाववाढ नोंदवली होती. मात्र, या भाववाढीचा सर्वाधिक फायदा हा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना झाला होता. यंदा मात्र, सुरुवातीलाच सोयाबीनच्या दरात मोठी घट झाली आहे. खरीप हंगामात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीनं सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागात झालेल्या जोरदार पावसानं फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतील हे पीक पार उध्वस्त झालं आहे. काही भागात आता सध्या शेतात राहिलेल्या सोयाबीनच्या पीक काढणीला प्रारंभ झाला आहे. गतवर्षी सोयाबीनला विक्रमी दर प्राप्त झाले होते. त्यामुळं यंदाही चांगले भाव मिळतील, या आशेपोटी शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र, सध्याचे भाव पाहता शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणीच फिरल्याचं चित्र दिसून येत आहे. सध्या शेतमाल घरात असताना सोयाबीन 5000 च्या खाली पोहोचल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहेत. काल 30 सप्टेंबरला अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनला 4500 ते 5100 असा दर मिळाला आहे. या दरामुळे सोयाबीन लागवडीचा खर्चही वसूल होतो की नाही? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
काढणीच्या वाढलेल्या दरामुळं शेतकरी मेटाकुटीस
एकीकडे भाव पडलेले असतानाच दुसरीकडं सोयाबीन सोंगणीच्या आणि काढणीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळं शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या सोंगणीचे दर 200 रुपयांने वाढले आहेत. गेल्या वर्षी दोन हजार रुपये असलेल्या सोंगणीचा दर यावर्षी 2 हजार 200 रुपयांवर पोहोचला आहे. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याने सोयाबीन काढणीचा म्हणजेच थ्रेशरिंगचा खर्चही वाढणार आहे. त्यामुळेच सोयाबीनच्या लागवडीचा खर्चही निघतो की नाही? असा यक्ष प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
काय असेल यावर्षी सोयाबीन पिकाची संभाव्य स्थिती
'सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया'च्या (Soybean Processors Association Of India) माहितीनुसार, 30 सप्टेंबर 2022 पर्यंत 27 लाख टनपेक्षा अधिक साठा शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. नव्या सोयाबीनची आवक राज्याच्या अनेक भागात झाली आहे. देशात मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान हे तीन प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य म्हणून ओळखले जातात. नव्या सोयाबीनची आवक आणि शिल्लक साठा यामुळं उत्पादक आणि साठवणूकदार हे दोघेही प्रक्रिया उद्योगांना मालाचा पुरवठा करण्याची घाई करीत आहेत. याच कारणामुळं राजस्थानातील प्रक्रिया उद्योगांना पुरवठा होणाऱ्या मालाच्या दरात 100 ते 300 रुपये प्रति क्विंटल इतकी घट झाली आहे. मध्य प्रदेशातील बैतूल, भोपाळ, दतिया आणि देवास या भागांत दर 200 ते 250 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. 5000 ते 5400 रुपये क्विंटलने या भागात सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. इंदूरमध्ये देखील प्रक्रिया उद्योगांना पुरवठा होणाऱ्या सोयाबीनच्या बाजारात मंदी होती. तरी सुद्धा दर 5000 रुपयांवर होते.
हमीभाव 4 हजार 300 रुपयांच्या आसपास
नागपूरच्या कळमना बाजार समितीत सोयाबीनची आवक सुरुवातीला अवघी 100 क्विंटलपर्यंत होती. त्यानंतर त्यात वाढ झाली आहे. आता ही आवक 500 क्विंटलवर पोहोचली आहे. 4 हजार 250 ते 5 हजार 75 रुपयांनी सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. हमीभाव 4 हजार 300 रुपयांच्या आसपास आहेत. यंदा सोयाबीन दर तेजीत राहण्याची शक्यता होती. परंतू, सोया ढेप आणि सोयाबीन आयातीमुळं दर हमीभावाच्या आसपास राहिले आहेत, असं जाणकारांनी सांगितलं आहे. शेतमालाचे भाव पडणं शेतकऱ्यांसाठी नवं नाही. मात्र दरवर्षीच हीच परिस्थिती नशिबात असणं, हे मात्र आपल्या व्यवस्थेचा आणि सरकारचं अपयश म्हणावे लागेल. त्यामुळे शेतकरी हिताच्या गोष्टी करणारं सरकार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी काही पावलं उचलणार का? आणि त्यांच्या घामाचं, त्यांच्या मेहनतीचं खऱ्या अर्थाने 'मोल' करणार का?, हाच खरा प्रश्न आहे.
महत्त्वाच्या बातम्या: