(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बीड, परभणी आणि जालन्यातील अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक; साखर आयुक्तांचा निर्णय
मराठवाड्यातील या तीन जिल्ह्यांमधील अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचं साखर आयुक्तांनी स्पष्ट केलं.
बीड: राज्यभरातील विशेषतः मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस प्रश्नी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सचिव डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शिष्टमंडळ आणि साखर आयुक्ताची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर असल्याचे साखर आयुक्तांनी मान्य केले आहे.
सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत साखर आयुक्तांनी बीड, परभणी, जालना येथे ऊस अतिरिक्त होऊ शकतो हे मान्य केलं. या ऊसाचे तात्काळ गाळप करण्याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी साखर आयुक्तांनी शिष्टमंडळास दिले.
डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली राज्य किसान सभेचे शिष्टमंडळ आज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना भेटले. या बैठकीत राज्य किसान सभेचे उमेश देशमुख, अॅड. अजय बुरांडे, मुरलीधर नागरगोजे, दत्ता डाके जगदीश फरताडे, दिपक लिपने, सुधाकर शिंदे यांच्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत साखर आयुक्तांनी बीड, परभणी, जालना व उस्मानाबाद येथील अतिरिक्त ऊस बाहेरील कारखान्यात गाळपाला जावा आणि दैनंदिन आकडेवारी शासनाच्या लक्षात यावी यासाठी बीड जिल्ह्यासाठी दोन आणि परभणी जिल्ह्यासाठी दोन विशेष नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करत याकडे लक्ष ठेवण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले.
प्रशासन, साखर कारखाने व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या समन्वयासाठी तसेच प्रत्येक ऊसाचे गाळप होईपर्यंत किसान सभा लक्ष देणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप होण्याबरोबरच उशिरा गाळप झाल्याने होणारे नुकसान भरपाई देण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली आहे..
जर अंमलबजावणी नाही झाली तर किसान सभा पुन्हा आंदोलन करणार
साखर आयुक्तांनी दिलेले ठोस आश्वासन प्रत्यक्षात अंमलात नाही आले तर राज्य किसान सभेकडून पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी साखर आयुक्तांना देण्यात आला.
साखर आयुक्तांसोबत किसान सभेची बैठकीतील महत्वाचे मुद्दे
- किसान सभेचे शिष्टमंडळ आज अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना भेटले.
- बीड, परभणी, जालना व उस्मानाबाद येथे अतिरिक्त ऊस असल्याचे साखर आयुक्तांनी मान्य केले.
- बीड, परभणी, जालना व उस्मानाबाद येथे अतिरिक्त ऊस असल्याचे साखर आयुक्तांनी मान्य केले.
- एकट्या बीड येथे 8,००,००० टन ऊस अतिरिक्त असल्याचे किसान सभेने 1127 गावांमध्ये केलेल्या सर्व्हेत लक्षात आले, सदर सर्व्हे साखर आयुक्तांनी बघताच ऊस अतिरिक्त असल्याचे मान्य केले.
- बीड व परभणी येथी अतिरिक्त ऊस बाहेरील गाळपास जावा आणि दैनंदिन आकडेवारी शासनाच्या लक्षात यावी यासाठी बीड साठी दोन आणि परभणीसाठी दोन विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करत लक्ष ठेवण्यात येईल.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha