Animal Husbandry : पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची काळजी कशी घ्यावी? जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी काय करावं?
सध्या पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्यांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं. पशुपालकांनी पावसाळ्यात जनावरांची नेमकी काळजी कशी घ्यावी याबाबतची माहिती.
Animal Husbandry : सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. राज्याच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. आणखी काही ठिकाणी म्हणावा तसा पाऊस पडत नाही. मात्र,पावसाळ्यात जनावरांची मोठी गैरसोय होते. शेतीकामासाठी बैल आणि दूधासाठी गाई म्हशींचे शेतकऱ्यांसाठी खूप महत्व आहे. अशा स्थितीत पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची नेमकी काळजी कशी घ्यावी, याची माहिती आपण पाहणार आहोत.
पावसाळ्यात जनावरांची काळजी घेणं महत्वाचं
आज नवे तंत्रज्ञान आलं असलं तरी बरेच शेतकरी पारंपरिक शेतीसाठी जनावरांचा उपयोग करतात. विशेषत: शेती कामासाठी बैल आणि दूधासाठी गाई म्हशींचे शेतकऱ्यांसाठी खूप महत्व आहे. सोबत शेळी मेंढी पालनासारखे जोड व्यवसाय देखील त्याच्या उत्पन्नात भर घालतात. त्यामुळं पावसाळ्यात अशा जनावरांची काळजी घेणं महत्वाचं आहे. पावसाळ्यात आर्द्रता वाढते आणि ऊन कमी असल्याने गोठा ओलसर रहातो. त्यामुळं जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. जनावरांची योग्य प्रकारे काळजी घेतली तर आजार कमी होवून पशुपालकाचे आर्थिक नुकसान होत नाही. बदलत्या वातावरणात प्राण्यांचे शरीर योग्य प्रकारे साथ देत नसल्यामुळं त्यांची प्रतिकारशक्ती कमी होवून जनावरे विविध प्रकारच्या आजारास बळी पडतात. त्यामुळं गोठ्याची काळजी, लसीकरण, जंतनाशक औषधीचा वापर, चाऱ्यांचे योग्य प्रकारे नियोजन करुन आपल्या जनावरांची पशुपालकांनी काळजी घेणे गरजेचं आहे.
गोठ्याचं योग्य व्यवस्थापन
पावसाळ्यात जनावरांच्या गोठ्याचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. गोठ्यात पाणी येणार नाही याबाबत पशुपालकांनी काळजी घ्यावी. पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणानी गोठा धुवून घ्यावा. गोठ्यात सुर्यप्रकाशासोबतच हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या असणं गरजेचे आहे. त्यामुळं गोठ्यातील जागा कोरडी राहण्यास मदत होईल. तसेच गोठ्यातील जनावरे एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून रवंथ करतील. गोठ्यातील दलदल कमी झाल्यास स्तनदाह आजार कमी होण्यास होतो.
गोठा कोरडा ठेवावा
पावसाळ्यात गोठ्यात पाणी साचणार नाही याचीदेखील दक्षता घ्यावी. जनावरांचे मलमूत्र वेळीच स्वच्छ करुन गोठा कोरडा करावा. निश्चित कालावधीत गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावं. गोठ्यातील हवा खेळती राहिल्यास आणि सुर्यप्रकाश असल्यास जनावरांच्यादृष्टीने चांगले वातावरण रहाते.
चारा व्यवस्थापन कसं कराल
जनावरांना पावसानं भिजलेला ओला चारा खाण्यासाठी देण्यात येऊ नये. ओले गवत मऊ असल्यानं जनावरे ते कमी वेळेत अधिक प्रमाणात खातात. परंतू, त्यात पाण्याचे प्रमाण अधिक आणि तंतूमय पदार्थ कमी असल्यानं जनावरांची पचनक्रिया बिघडून त्यांना जुलाब होतात. त्यामुळं जनावरांसाठी देण्यात येणारं पशुखाद्य किंवा सुका चारा कोरडा राहील याबाबत दक्षता घ्यावी.
पाऊस जनावरांना घेवून झाडाखाली थांबू नका
जनावरांना बाहेर चरण्यासाठी घेवून जातांना विशेष काळजी घ्यावी. जनावरांना पाऊस किंवा विजा पडतांना झाडाखाली घेवून थांबू नये. जवळपास निवारा असल्यास त्याठिकाणी घेवून थांबावं. पावसाळ्याच्या सुरुवातीस बागायती क्षेत्रात फुलीचे गवत मोठ्या प्रमाणात आढळून येते. जनावरांना फुलीचे गवत खावू घातल्यास विषबाधेमुळं कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन जनावरे दगावतात. विशेषत मेंढ्यामध्ये हा प्रकार आढळून येतो. त्यामुळं पशुपालकांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.
पावसाळ्यातील वातावरण विविध कृमींसाठी अनुकूल असते. त्यामुळे विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. जनावरांच्या सभोवतीचे वातावरण स्वच्छ आणि कोरडे ठेवल्यास त्यांना होणारा आजाराचा संसर्ग टाळता येतो. त्यासोबतच त्यांचे पोषण आणि पावसाळ्यातील आजाराबाबत माहिती करून घेत योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.