(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Kisan Yojana : PM किसानचा 14 वा हप्ता आज शेतकऱ्यांना मिळणार, राजस्थानमधून पंतप्रधानांच्या हस्ते वितरण होणार
PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात वितरीत केला जाणार आहे.
PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) चौदावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात वितरीत केला जाणार आहे. एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीचा देय लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. राजस्थानमधील (Rajasthan) सीकर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन समारंभाद्वारे PM किसानचा 14 वा हप्ता वितरीत केला जाणार आहे. याबाबतची माहिती विस्तार व प्रशिक्षण कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील 85 लाख 66 हजार पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने पीएम किसान योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये यांना दोन हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणं तीन समान हप्त्यात प्रती वर्षी सहा हजार रुपये लाभ देण्यात येतो. 27 जुलै रोजी महाराष्ट्रातील 85 लाख 66 हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारणत: 1 हजार 866 कोटी 40 लाख रुपये इतका लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे.
भारत सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत
PM किसान सन्मान निधी योजने अंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. हे सहा हजार रुपये प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. आत्तापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता पुढचा 14 हप्ता कधी येणार याची चर्चा सुरु होती. पण आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. येत्या 27 जुलैला pm किसानचा 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
आधार संलग्न करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी
या योजनेचा लाभ आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राज्यातील 88 लाख 92 हजार लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न लाभ अदायगीसाठी नोंदणीकृत झाले आहेत. उर्वरीत सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न करण्याकरीता संबंधित बँकेत अर्ज सादर करून आधार संलग्न करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन कृषी आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे. चौदाव्या हप्त्याची हस्तांतरित करावयाची रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे सारख्या कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून राज्यात या योजनेंतर्गत 25 जुलै 2023 अखेर 23 हजार 731 कोटी 81 लाख रुपये रक्कमेचा लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे.
दरम्यान, आजच्या राजस्थानमधील या समारंभास केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया उपस्थित राहणार आहेत. या समारंभामध्ये कृषी विज्ञान केंद्रावर https://pmindiawebcast.nic.in या लिंकचा वापर करून परिसरातील शेतकऱ्यांना सहभागी होता येईल, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: