Agriculture : प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा तिसरा आगाऊ अंदाज जाहीर, देशात 314.51 दशलक्ष टन विक्रमी अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज
कृषी पिकांच्या उत्पादनाचा तिसरा आगाऊ अंदाज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केला आहे. देशात अन्नधान्याचे उत्पादन विक्रमी 314.51 दशलक्ष टन असल्याचा अंदाज सांगण्यात आला आहे.
Agriculture News : 2021-22 या वर्षातील प्रमुख कृषी पिकांच्या उत्पादनाचा तिसरा आगाऊ अंदाज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केला आहे. देशात अन्नधान्याचे उत्पादन विक्रमी 314.51 दशलक्ष टन असल्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. जो 2020-21 मधील अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा 3.77 दशलक्ष टन अधिक आहे. 2021-22 मधील उत्पादन मागील पाच वर्षांच्या (2016-17 ते 2020-21) अन्नधान्याच्या सरासरी उत्पादनापेक्षा 23.80 दशलक्ष टनांनी जास्त आहे.
या पिकांच्या विक्रमी उत्पादनाचा अंदाज
तांदूळ, मका, डाळी, तेलबिया, हरभरा, रॅपसीड, मोहरी आणि उसाच्या विक्रमी उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एवढ्या विविध प्रकारच्या पिकांचे विक्रमी उत्पादन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या शेतकरी हिताच्या धोरणांचे. तसेच शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे आणि शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे फलित असल्याचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. विविध पिकांच्या उत्पादनाचे मूल्यमापन राज्यांकडून प्राप्त झालेल्या डेटावर आधारित आहे आणि इतर स्त्रोतांकडून उपलब्ध माहितीसह प्रमाणित केले आहे. 2007-08 नंतरच्या वर्षांच्या तुलनात्मक अंदाजानुसार विविध पिकांचा 2021-22 करिता उत्पादनाचा 3 रा आगाऊ अंदाज आहे.
2021-22 मध्ये प्रमुख पिकांचे अंदाजे उत्पादन
अन्नधान्य 314.51 दशलक्ष टन,
तांदूळ 129.66 दशलक्ष टन. (विक्रमी),
गहू 106.41 दशलक्ष टन,
पोषण / भरड तृणधान्ये 50.70 दशलक्ष टन,
मका 33.18 दशलक्ष टन. (विक्रमी),
डाळी 27.75 दशलक्ष टन.(विक्रमी),
तूर 4.35 दशलक्ष टन,
हरभरा 13.98 दशलक्ष टन.(विक्रमी),
तेलबिया 38.50 दशलक्ष टन (विक्रमी),
भुईमूग 10.09 दशलक्ष टन,
सोयाबीन 13.83 दशलक्ष टन,
रॅपसीड आणि मोहरी 11.75 दशलक्ष टन. (विक्रमी),
ऊस 430.50 दशलक्ष टन (विक्रमी),
कापूस 31.54 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 170 किलो),
ताग आणि मेस्टा 10.22 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 180 किलो).
तांदळाच्या उत्पादनात विक्रमी वाढीची शक्यता
2021-22 च्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, देशात एकूण अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाले असून, एकूण अन्नधान्य उत्पादन 314.51 दशलक्ष टन झाले असल्याचा अंदाज आहे. जे गतवर्षीच्या 2020-21 मधील अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा 3.77 दशलक्ष टनाने अधिक आहे. याशिवाय, 2021-22 मधील हे उत्पादन मागील पाच वर्षांच्या अन्नधान्याच्या सरासरी उत्पादनापेक्षा (2016-17 ते 2020-21) 23.80 दशलक्ष टनांनी अधिक आहे. 2021-22 मध्ये तांदळाचे एकूण उत्पादन 129.66 दशलक्ष टन इतके विक्रमी असल्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांच्या सरासरी 116.43 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा ते 13.23 दशलक्ष टनांनी अधिक आहे.
गव्हाच्या उत्पादनातही वाढीची शक्यता
2021-22 मध्ये गव्हाचे उत्पादन 106.41 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे .गेल्या पाच वर्षांच्या सरासरी 103.88 दशलक्ष टन गव्हाच्या उत्पादनापेक्षा ते 2.53 दशलक्ष टनांनी जास्त आहे. पोषक/ भरड तृणधान्यांचे उत्पादन अंदाजे 50.70 दशलक्ष टन झाले असल्याचा अंदाज आहे. जे गेल्या पाच वर्षांच्या सरासरी 46.57 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा 4.12 दशलक्ष टनांनी अधिक आहे. 2021-22 मध्ये एकूण कडधान्यांचे उत्पादन 27.75 दशलक्ष टन झाले असल्याचा अंदाज आहे. जे गेल्या पाच वर्षांच्या सरासरी 23.82 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा 3.92 दशलक्ष टन अधिक आहे.
तेलबियांच्या उत्पादनातही वाढ
2021-22 मध्ये देशातील एकूण तेलबियांचे उत्पादन 38.50 दशलक्ष टन झाले असल्याचा अंदाज आहे. जे 2020-21 मधील 35.95 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा 2.55 दशलक्ष टन जास्त आहे. शिवाय, 2021-22 मधील तेलबियांचे उत्पादन सरासरी तेलबिया उत्पादनापेक्षा 5.81 दशलक्ष टनांनी जास्त आहे. 2021-22 मध्ये देशातील उसाचे एकूण उत्पादन 430.50 दशलक्ष टन इतके विक्रमी झाले असल्याचा अंदाज आहे. जे नेहमीच्या सरासरी 373.46 दशलक्ष टन ऊस उत्पादनापेक्षा 57.04 दशलक्ष टन अधिक आहे. कापूस तसेच ताग आणि मेस्ताचे उत्पादन अनुक्रमे 31.54 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 170 किलो) आणि 10.22 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 180 किलो) झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.