(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश देण्यासाठी भारत सज्ज, इंदोरमध्ये रंगणार मालिकेतील अखेरचा टी20 सामना
IND vs SA : भारताने दुसरा टी20 सामना जिंकल्यामुळे तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिकाही खिशात घातली आहे. पण व्हाईट वॉश देण्याकरता अखेरचा सामना जिंकणं गरजेचं आहे.
IND vs SA T20 Series : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेतील अखेरचा सामना उद्या अर्थात 4 ऑक्टोबर रोजी इंदोरमध्ये (IND vs SA 3rd t20 indore) रंगणार आहे. भारताने गुवाहाटीमध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात 16 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिकाही खिशात घातली आहे. पण व्हाईट वॉश देण्याकरता अखेरचा सामना जिंकणं गरजेचं आहे.
आगामी टी20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2022) भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही टी20 मालिका एक प्रकारचे सराव सामने असल्याने भारताला चांगली कामगिरी करणं गरजेचं होतं. त्यानुसार भारताने चमकदार कामगिरी नक्कीच केली. भारताने आधी ऑस्ट्रेलियाला तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने मात दिली. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही भारत पहिल्या सामन्यापासून कमाल फॉर्ममध्ये दिसत आहे. पहिला सामना 8 विकेट्सच्या फरकाने भारताने जिंकल्यानंतर दुसरा सामना भारताने 16 धावांनी जिंकला. यावेळी आधी फलंदाजी करत भारताने 237 धावांचा डोंगर उभारत दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धाावंचे आव्हान ठेवलं. ज्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या डी कॉक आणि मिलर जोडीने अप्रतिम खेळ दाखवत कडवी झुंज दिली. पण ते 20 षटकांत 221 धावाच करु शकल्याने भारत 16 धावांनी सामना जिंकला. आता अंतिम टी20 जिंकून व्हाईट वॉश भारत देऊ इच्छित आहे. तर दक्षिण आफ्रिका मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी20 सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याच लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
कशी असू शकते दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर
हे देखील वाचा -