(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Happy Birthday Ekta Kapoor : वयाच्या 15व्या वर्षी केली करिअरची सुरुवात, 'टेलिव्हिजन क्वीन' म्हणून मनोरंजन विश्व गाजवतेय एकता कपूर!
Ekta Kapoor Birthday : निर्माती आणि दिग्दर्शिका असणारी एकता कपूर, मनोरंजन क्षेत्रात 'टेलिव्हिजन क्वीन' म्हणून प्रसिद्ध आहे.
Ekta Kapoor Birthday : प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र आणि शोभा कपूर यांची मुलगी एकता कपूर (Ekta Kapoor) आज टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि ओटीटीची राणी बनली आहे. निर्माती आणि दिग्दर्शिका असणारी एकता कपूर, मनोरंजन क्षेत्रात 'टेलिव्हिजन क्वीन' म्हणून प्रसिद्ध आहे. एकता कपूर आज (7 जून) आपला 47वा वाढदिवस साजरा करत आहे. केवळ टीव्हीच नाही, तर बॉलिवूडमध्येही तिने आपली खास ओळख निर्माण केली आहे.
एकता कपूर ही ज्येष्ठ चित्रपट अभिनेते जितेंद्र आणि शोभा कपूर यांची मुलगी आहे. एकताचा जन्म 7 जून 1975 रोजी झाला. तिचा धाकटा भाऊ तुषार कपूर चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. एकताने वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी कैलाश सुरेंद्रनाथ यांच्या जाहिरात आणि चित्रपट निर्मिती कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. इथूनच तिने तिच्या करिअरची सुरुवात केली. याकाळात तिने निर्मिती क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यात तिला अपयश आले.
‘बालाजी टेलिफिल्म्स’ची सुरुवात
पहिल्या अपयशानंतर, एकताने तिच्या वडिलांच्या सल्ल्यानुसार स्वतंत्र्य निर्माती बनण्याचा निर्णय घेतला. यानंतर एकताने 1994मध्ये वडिलांच्या मदतीने ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची सुरुवात केली. अनेक संघर्षानंतर एकताची मेहनत फळाला आली. 1995मध्ये बालाजी टेलिफिल्म्सच्या बॅनरखाली एकताची पहिली मालिका 'पडोसन' तयार झाली. ‘पडोसन’ ही एक विनोदी मालिका होती, जी दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. त्याच वर्षी एकताच्या आणखी तीन मालिका प्रदर्शित झाल्या, त्यात 'हम पांच' ही प्रसिद्ध मालिका होती. या मालिकेमुळे एकताला एक यशस्वी आणि चांगली निर्माती म्हणून एकताला ओळख मिळाली. यानंतर तिने बालाजी टेलिफिल्म बॅनरखाली 130हून अधिक डेली सोप तयार केल्या आहेत.
‘अशी’ बनली टेलिव्हिजन क्वीन!
2000 मध्ये एकताने अनेक टेलिव्हिजन मालिकांची निर्मिती केली, ज्या प्रत्येक घराघरात प्रसिद्ध झाल्या. या काळात एकताने टेलिव्हिजन विश्वावर राज्य करण्यास सुरुवात केली. तिने निर्मित केलेल्या 'घर एक मंदिर' आणि 'क्यूंकी सांस भी कभी बहू थी' या मालिकांनी लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. या मालिकांनी एकताला यशाच्या नव्या उंचीवर नेले. एकता टेलिव्हिजन क्वीन बनली. एकताच्या प्रसिद्ध मालिकांमध्ये ‘कुटुंब’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘कुमकुम भाग्य’ इत्यादी मालिकांचा समावेश आहे.
चित्रपट आणि ओटीटी जगतातही गाजवतेय नाव
2001मध्ये, एकताने 'क्यूंकी में झुठ नहीं बोलता' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर एकताने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले ज्यात ‘कुछ तो है’, ‘लव्ह सेक्स और धोका’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘शोर इन द सिटी’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘लुटेरा’, ‘उडता पंजाब’, ‘ड्रीम गर्ल’ इत्यादींचा समावेश आहे. यानंतर एकताने तिचा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म ‘Alt Balaji’ सुरु केला. मालिका आणि चित्रपटांव्यतिरिक्त, एकताने अनेक वेब सीरीज देखील तयार केल्या आहेत. एकता कपूर केवळ टेलिव्हिजनवरचे नाही, तर चित्रपट जगतात एक मोठे नाव आहे. मनोरंजन विश्वातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल भारत सरकारने तिला 2020मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
हेही वाचा :
Aathva Rang Premacha : 'आठवा रंग प्रेमाचा' सिनेमातील रिंकू राजगुरुचा लूक रिव्हील; ट्रेलर आऊट
Vikram Box Office Collection : कमल हासनच्या 'विक्रम'चा महाविक्रम; तीन दिवसांत केली 160 कोटींची कमाई
KK Last Song : 'धूप पानी बहने दे' केके यांचं शेवटचं गाणं रिलीज; चाहते झाले भावूक