महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
Maharashtra Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. महायुतीला जोरदार धक्का देत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली.
![महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला PM Modi on Maharashtra Lok Sabha Election result 2024 eknath shinde sunil tatkare nda khasdar delhi marathi news महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/7f9f6c306e1a264fac211b9980e87c701717645240706265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PM Modi on Maharashtra Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. महायुतीला जोरदार धक्का देत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. राज्यात महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले. भाजप 9, शिवसेना 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका जागेवरच समाधान मानावे लागले. राज्यात महायुतीला जोरदार धक्का बसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी घेतली. राज्यातील पराभवाची कारणे महायुतीकडून जाणून घेतली जात आहेत. नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्रातील पराभवाची कारणे जाणून घेतली. एनडीएच्या बैठकीत शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते.
चुका सुधारा, विधानसभेला एकत्र काम करा, मोदींचे निर्देश -
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्रातील नेत्यांकडून राज्यातील पराभवाची कारणं जाणून घेतली. एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी राज्यात महायुतीला कुठं फटका बसला, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं. राज्यातील मराठा आंदोलन, उमेदवार वाटपात झालेला घोळ, विदर्भातील संत्रा, धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ही प्रमुख कारणं असल्याची माहिती मोदींना दिली. राज्यांतील अल्पसंख्याक, दलित, धनगर आणि मराठा समाजाचा महाविकास आघाडीकडे वाढलेला ओढा अडचण ठरत असल्याची देखील सांगण्यात आले. विधानसभेला चुका सुधारून एकत्रित काम करण्याचे निर्देश यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.
फडणवीस आज दिल्लीला जाणार -
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यातील पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत ते चर्चा करण्याची शक्यता आहे. केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांची विनंती मान्य करणार का? याबाबत राजकीय चर्चा सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 30
महायुती- 17
अपक्ष- 1
महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)