IPL Auction 2021 | आयपीएलसाठी उद्या चेन्नईत खेळाडूंचा लिलाव; 292 खेळाडूंवर लागणार बोली
आयपीएलचा चौदावा मोसम अजूनही महिना-दीड महिना दूर आहे. पण आगामी मोसमाच्या निमित्तानं उद्या होत असलेल्या लिलावाची उत्सुकता भारतीय क्रिकेटमध्ये सध्या शिगेला पोहोचली आहे. चेन्नईतल्या पंचतारांकित हॉटेलात आयपीएलचा लिलाव उद्या (18 फेब्रुवारी) दुपारी तीन वाजता सुरु होईल. आयपीएलच्या लिलावासाठी 1114 खेळाडूंनी आपल्या नावांची नोंदणी केली होती. त्यापैकी 164 भारतीय आणि 128 परदेशी खेळाडूंच्या नावाची लिलावासाठी छाननी करण्यात आली आहे. त्यामुळं आयपीएलच्या रणांगणातल्या आठ फ्रँचाईझी त्या 292 खेळाडूंमधल्या सर्वोत्तम पर्यायांवर बोली लावताना दिसतील.
आयपीएलच्या या लिलावात भारताच्या हरभजनसिंग आणि केदार जाधव यांच्यासह अकरा परदेशी शिलेदारांना मोठा भाव येण्याची शक्यता आहे. हरभजन आणि केदार जाधव यांना चेन्नई सुपर किंग्सनं आपल्या कॉण्ट्रॅक्टमधून पुन्हा लिलावासाठी मोकळं केलं आहे. त्या दोघांसह अकरा परदेशी शिलेदारांची मूळ किंमत दोन कोटी रुपये ठरवण्यात आली आहे. ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, शकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लन्केट, जेसन रॉय आणि मार्क वूड यांचा त्या अकराजणांत समावेश आहे.