मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
अहिल्यानगर मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाने खाते उघडले असून राष्ट्रवादीचे कुमार वाकळे यांची प्रभाग क्र.8 ड मधून बिनविरोध निवड झाली आहे.

अहिल्यानगर : पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या म्हणून लक्ष लागलेल्या अहिल्यानगर (Ahilyanagar) महापालिकेच्या 68 जागांसाठी एकूण 788 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी विविध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत एकूण 17अर्ज अवैध ठरवून बाद करण्यात आले आहेत, मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे बाद झालेल्या अर्जामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या 5 उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने (NCP) अहिल्यानगरमधून विजयाचा खातं उघडलं. येथील राष्ट्रवादीचे (Ajit pawar) कुमार वाकळे बिनविरोध निवड झाले आहेत.
अहिल्यानगर मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाने खाते उघडले असून राष्ट्रवादीचे कुमार वाकळे यांची प्रभाग क्र.8 ड मधून बिनविरोध निवड झाली आहे. कुमार वाकळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांचा एकमेव अर्ज वैध झाला होता. मात्र, आज पोपट कोलते यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे, आत्तापर्यंत राज्यात 8 उमेदवार बिनविरोध निवड झाले आहेत. त्यामध्ये, भाजपच्या 6, एकनाथ शिंदेंच्या 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे 5 अर्ज बाद
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सर्वाधिक म्हणजेच 54 उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शिंदेसेनेच्या पाच उमेदवारांचे अर्ज छाननीअंती अवैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक रणांगणात शिंदेसेनेचे उमेदवार आता 49 वर आले असून, हा पक्षासाठी निवडणुकीपूर्वीच मोठा झटका मानला जात आहे. मात्र, शिंदेसेनेच्या ज्या उमेदवारांचे पक्षीय अर्ज बाद झाले, त्यांचे अपक्ष अर्ज ग्राह्य धरण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आजपासून उमेदवारी अर्ज माघारीचा पहिला दिवस असून 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे कोणते उमेदवार माघार घेतात, कोणत्या प्रभागात लढत रंगते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. माघारीनंतरच अहिल्यानगर महापालिकेतील अंतिम राजकीय समीकरण स्पष्ट होणार आहे.
2018–23 या कालावधीतील पक्षीय बलाबल - (एकूण नगरसेवक : 68)
शिवसेना – 24
राष्ट्रवादी काँग्रेस – 18
भाजप – 14
काँग्रेस – 5
बसपा – 4
समाजवादी पार्टी – 1
इतर – 2
दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यानंतर 2020 साली राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला सहकार्य केले आणि शिवसेनेच्या रोहिणीताई शेंडगे या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर झाल्या. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर महानगरपालिकेतील नगरसेवकांचे पक्षीय समीकरणही मोठ्या प्रमाणावर बदलले.
हेही वाचा
मोठी बातमी : शिंदेंच्या उमेदवाराविरुद्ध ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, आमदारपुत्राची बिनविरोध निवड




















