IPL 2022: IPL च्या 2 नव्या संघांच्या लिलावासाठी BCCI ची निविदा,BCCI ला 5000 कोटींचा धनलाभ? ABP Majha
IPL New Teams : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) इंडियन प्रीमियर लीगच्या 2022 मध्ये होणाऱ्या पुढील सीजनमध्ये आणखी दोन फ्रँचायझींचा समावेश करणार आहे. बीसीसीआयने या संघांची मूळ किंमत 2000 कोटी रुपये निश्चित केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन फ्रँचायझीच्या लिलावादरम्यान ही रक्कम 5000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची बोर्डाला अपेक्षा आहे. अदानी ग्रुप, आरपीजी संजीव गोयंका ग्रुप आणि प्रसिद्ध फार्मा कंपनी टोरेंट नवीन फ्रँचायझी विकत घेण्यासाठी आघाडीवर आहेत.
आयपीएलमध्ये सध्या आठ संघ सहभागी झाले आहेत. मात्र पुढील सीजनपासून, 10 संघ त्यात खेळताना दिसू शकतील. बोर्डाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत दोन नवीन फ्रँचायझींच्या बोली प्रक्रियेबाबतचे सर्व नियम ठरवण्यात आले आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोणतीही कंपनी 75 कोटी रुपये जमा करून बोली दस्तऐवज खरेदी करू शकते. आधी नवीन फ्रँचायझीची मूळ किंमत 1700 कोटी रुपये ठेवण्याचा विचार बोर्ड करत होता. परंतु नंतर ही किंमत 2000 कोटी रुपये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
बीसीसीआयला लिलावातून 5000 कोटी रुपये उभारण्याची आशा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय या दोन नवीन फ्रँचायझींसाठी बोली प्रक्रियेतून 5000 कोटी रुपये उभारण्याची आशा करत आहे. पुढील वर्षी या स्पर्धेत 74 सामने खेळले जातील आणि ते सर्वांसाठी पर्वणी ठरणार आहेत. माहितीनुसार, फक्त त्या कंपन्या या नवीन फ्रँचायझीसाठी बोली लावण्यास सक्षम असतील ज्यांची वार्षिक उलाढाल 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.